Wednesday, 16 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 16 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

युपीआयद्वारे व्यक्ती-ते-व्यक्ती होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. तसंच युपीआयद्वारे व्यापाऱ्यांना केल्या जाणाऱ्या दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर आणि लहान व्यापाऱ्यांसाठीचे व्यवहारही विनाशुल्क राहतील, असंही अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. एमडीआर फक्त दोन हजार रुपयांपेक्षाजास्त रकमेच्या विशिष्ट व्यापारी व्यवहारांना लागू होईल, असंही अर्थ मंत्रालयानं नमूद केलं आहे. हा बदल येत्या १५ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

****

 महिला प्रवाशांची सुरक्षा, आरोग्य आणि सन्मानार्थ राज्यभरातील एसटी बसस्थानकांवर येत्या तीन वर्षांत १२५ हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर यांच्यात या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या कक्षांमध्ये मातांना स्तनपानासह बाळाची निगा राखण्यासाठी आवश्यक अशी सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

****

गणेशोत्सवात सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विशेष मोहीम सुरू केली आहे. ध्वनी प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातल्या २७ शहरांमध्ये विशेष निरीक्षण मोहीम राबविण्यात येणार असून याअंतर्गत १३२ निरीक्षण केंद्रांवर ध्वनी पातळीचे मोजमाप केलं जाणार आहे. येत्या १९, २० आणि २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनी पातळीचे निरीक्षण केलं जाणार आहे.

****

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानाधारित आणि लोकाभिमुख करण्यासाठी ‘प्रगती’ या सर्वसमावेशक आरोग्य सुधारणा प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाची सुधारित किंमत चार हजार २५० कोटी रुपये आहे. ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यात ५०० खाटांचे रुग्णालय तसंच लातूर जिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० वरून ३०० खाटांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

****

हैदराबाद मुक्ती दिवस उद्या साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्या सकाळी साडे आठ वाजता कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या नंतर महात्मा फुले सभागृहात प्रसिद्ध लेखक डॉ. सुशील धसकटे यांचे मराठवाडा: भाषा आणि संस्कृती विषयावर व्याख्यान होणार आहे. हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त विभागात सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यातल्या बारड इथंही उद्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त प्रशासनातर्फे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामात बारड इथल्या तेहतीस स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग घेऊन मोलाचं योगदान दिलं होतं, या शूर स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम होणार आहे.

****

शासकीय भरती संदर्भात स्थापन अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची आज नागपूर इथे बैठक होत आहे. भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी मागवलेल्या सूचना आणि हरकतींवर या बैठकीत चर्चा होणार आहे. सदर सूचना आणि शिफारशींचा सखोल अभ्यास करून, ही समिती, राज्य शासनाला सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करणार आहे.

****

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी इथून मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे यांनी काल बीड जिल्ह्यात पाटोदा इथं मुक्काम केला. आज पहाटे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं ते यावेळी म्हणाले. त्यानंतर ते पुढील मुक्कामासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंद्याकडे रवाना झाले. जरांगे यांनी मोजक्या दहा सहकाऱ्यांसमवेत काल उपोषणाच्या १८ व्या दिवशी मुंबईकडे प्रयाण केलं आहे.

****

ज्येष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मी पूजनाच्या तीन दिवसीय उत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. गौरींचे मुखवटे, साड्या, दागदागिने, मखर आणि सजावटीच्या साहित्यासह, महानैवेद्याच्या तयारीसाठी बाजारात महिला वर्गाची गर्दी दिसून येत आहे.

****

शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानात संत श्री गजानन महाराजांच्या ११६ व्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या चार दिवसांच्या उत्सवाची काल भक्तिमय वातावरणात सांगता झाली. या उत्सवात ३९७ दिंड्यांनी सहभाग नोंदवला होता.

****

बीड जिल्ह्यात मागील दोन दिवसात पावसानं सर्वदूर हजेरी लावली. माजलगाव तालुक्यातील माजलगाव आणि कीट्टीआडगाव महसूल मंडळात प्रत्येकी ६७ पूर्णांक ३ मिमी पावसाची नोंद झाली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...