Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 28
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ सप्टेंबर २०२७ दुपारी
१.०० वा.
****
भारताने पाकिस्तानातले दहशतवादी
तळ उद्ध्वस्त करण्यासाठी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आज दहा वर्ष पूर्ण झाली. २८ आणि २९ सप्टेंबर २०१६
च्या रात्री, लष्कराने नियंत्रण रेषेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर लक्ष्यित कारवाई
केली होती. १८ सप्टेंबर रोजी झालेल्या उरी दहशतवादी हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात
आली होती, ज्यात १८ भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. या कारवाईमुळे
दहशतवादाविरोधातल्या भारताच्या सुरक्षा धोरणात एक महत्त्वाचा बदल घडला. त्यानंतर
पाकिस्तानविरोधात २०१९ मध्ये बालाकोट आणि २०२५ मध्ये ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई
करण्यात आली. काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल
स्ट्राईक हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं नमूद केलं.
****
थोर क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी भगतसिंग यांना आदरांजली वाहिली. भगतसिंग यांनी आपल्या अदम्य धैर्याने आणि शौर्याने
स्वातंत्र्य चळवळीत नवी ऊर्जा निर्माण केली. राष्ट्राच्या सन्मानासाठी सर्वस्व
त्याग करण्याची त्यांची वृत्ती देशातल्या तरुणांच्या धैर्याचं आणि निर्धाराचं
प्रतीक असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. लता दीदींनी आपल्या दिव्य गायन प्रतिभेने संपूर्ण जगात भारताचं नाव उज्ज्वल केलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. लता दीदींनी आपल्या सुमधुर गायनाने भारताला समृद्ध तर केलंच, त्याचसोबत देशाच्या प्रगतीशी संबंधित प्रत्येक उपक्रमाला त्यांनी प्रोत्साहन दिलं, भारतीय संगीत विश्वाला त्यांनी दिलेलं अतुलनीय योगदान कायम संस्मरणीय राहील, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली आहे. वडिलांच्या अलौकिक गायकीचा वारसा जपत, आपल्या लाघवी आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लतादीदींना वंदन करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
पाकिटबंद खाद्यपदार्थांवर धोक्याचा इशारा देण्याबाबत दाखल याचिकेवरचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. अति साखर, मीठ आणि चरबीयुक्त खाद्यपदार्थांवर 'Front-of-Pack
Warning Labels' अनिवार्य करण्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने आज हा निर्णय राखून ठेवत असल्याचं सांगितलं.
****
देशभरातल्या बँक
कर्मचाऱ्यांचा आजपासून प्रस्तावित असलेला तीन दिवसांचा संप स्थगित करण्यात आला आहे. ऑल
इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला. काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन
आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात संपाशी संबंधित मुद्द्यांवर झालेल्या
बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं असोसिएशननं समाज माध्यमावरील संदेशात सांगितलं. दोन्ही संघटनांच्या
बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या
मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
****
उत्तराखंडमध्ये खराब हवामानामुळे काल आणि परवा स्थगित झालेली चार धाम यात्रा, आज पुन्हा सुरु करण्यात आली. गढ़वाल विभागाचे आयुक्त आनंद स्वरूप यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश जारी केले आहेत.
दरम्यान, केदारनाथ इथली हेलीकॉप्टर सेवा सुरळीत सुरु असून, प्रशासनानं यात्रेकरुंना पोलिसांच्या सुचनेचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
मतदार याद्यांवरून
विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांवरून तसंच विविध राजकीय मुद्द्यांवरून भाजप
नेते परिणय फुके यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर टीका केली. काँग्रेस देशात
अराजकता निर्माण करण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत केला. मृत व्यक्तींची नावं वगळणं तसंच स्थलांतरित झालेल्या
नागरिकांच्या नावांमध्ये आवश्यक ती दुरुस्ती करणं गरजेचं आहे, मात्र, पराभव समोर दिसू
लागल्याने विरोधकांकडून आता आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याची टीका फुके यांनी केली.
दरम्यान, धान उत्पादक
शेतकऱ्यांच्या बोनसचा प्रश्न सध्या प्रलंबित आहे. मागील थकीत विषयांसह याबाबत
सरकारकडे चर्चा सुरू असून, येत्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार धान उत्पादक
शेतकऱ्यांसाठी मोठ्या बोनसची अधिकृत घोषणा करेल, असा विश्वासही फुके यांनी यावेळी व्यक्त केला.
****
जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या २५ मीटर पिस्टल स्पर्धेत भारताच्या ईशा सिंगने आज रौप्य पदक जिंकलं. कुस्ती मधल्या कुराश प्रकारात महिलांच्या ७८ किलो वजनी गटात पिंकी बलहारा हिने कांस्य पदक जिंकलं. पुरुष क्रिकेटमध्ये आज उपान्त्यपूर्व फेरीत भारत- अफगाणिस्तान सामना खराब हवामानामुळे रद्द झाला. आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रमवारीत प्रथम स्थानावर असल्यामुळे भारतीय संघ हा सामना न खेळता उपान्त्य फेरीत दाखल झाला.
मुष्टियुद्धात महिलांच्या उपान्त्यपूर्व फेरीत लवलिना बोर्गोहेन हिने दक्षिण कोरियाच्या खेळाडुचा पराभव केला.
या स्पर्धेत भारताने आतापर्यंत चार सुवर्ण, १७ रौप्य आणि १८ कांस्य पदकं, असे एकूण ३९ पदक जिंकली आहेत.
****
No comments:
Post a Comment