Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 September
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपतींकडून
देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन-राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान; महाराष्ट्रातल्या
नऊ शिक्षकांचा समावेश
· १२ सप्टेंबरनंतर मराठा समाज मुंबईकडे कूच करणार - आंदोलक मनोज जरांगे यांचा इशारा
· दहीहंडीचा सोहळा सर्वत्र उत्साहात साजरा; मुंबई - ठाण्यात १२८ गोविंदा
जखमी, तीन जणांचा मृत्यू
· महिलांच्या आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सात खेळाडू
राखून विजय
आणि
· चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताची सात्विक - चिराग जोडी
अंतिम फेरीत दाखल
****
प्राथमिक शाळांमधलं विद्यार्थी गळतीचं प्रमाण जवळपास शून्यावर आल्याबद्दल राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी देशभरातल्या शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे. काल शिक्षक दिनानिमित्त
दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात त्या बोलत होत्या. १२ वर्षांपूर्वी
साडे चार टक्क्यांवर असलेलं हे प्रमाण शून्यावर आल्याबद्दल समाधान व्यक्त करत, एकही विद्यार्थी शिक्षणापासून
वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रपती मुर्मू यांनी शिक्षकांना
केलं. त्या म्हणाल्या...
बाईट -
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
भारतीय संस्कृती आणि परंपरेचा
आदर राखताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणं, मानवतेसाठी
काम करणं, अंत्योदयाच्या दिशेने काम करणं, पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य
देण्याची शिकवण विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं.
देशभरातल्या ४८ शिक्षकांसह
उच्च शिक्षण क्षेत्रातल्या २१ शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी गौरवण्यात आलं.
यामध्ये बीड जिल्ह्याच्या केज इथल्या कविता गित्ते, नाशिकच्या कुंदा बच्छाव, लातूरचे
वैभव कुलकर्णी, साताऱ्याचे शिवप्रसाद टिंगरे, आयआयटी मुंबईतले विक्रम विशाल, वर्ध्याचे
अमर ताकसांडे, सोलापूरचे संदीपान नरोटे, धाराशिवचे किरण झरकर आणि नाशिकच्या अर्चना जाधव यांचा
समावेश आहे.
****
आर्थिक सहकार्यासोबतच मानवी
मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि परस्पर संवादातून अधिक समतोल, शांततामय आणि समृद्ध जगाची
निर्मिती शक्य असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत
काल ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६’ च्या दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विविध देशांचे महावाणिज्यदूत, भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि
दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशातल्या राजनैतिक प्रतिनिधी आणि उद्योजकांसह, अनेक मान्यवर
उपस्थित होते. भारताने आपल्या इतिहासात वस्तू आणि व्यापारासह विचार, ज्ञान आणि
जीवनमूल्यांचाही जगभर प्रसार केला, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नमूद केलं.
****
राज्य शासनामार्फत घेण्यात
येणाऱ्या विद्यमान भरती परीक्षेचा सर्वंकष अभ्यास करून ती अधिक पारदर्शक करण्याच्या
उद्देशानं आवश्यक सुधारणा सुचवण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. सामान्य
प्रशासन विभागानं यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला. सामान्य प्रशासन विभागाच्या
अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली या सात सदस्यीय समितीत पोलिस महासंचालक
सदानंद दाते, यांचा समावेश आहे.
****
राष्ट्रीय परीक्षा संस्था
- एनटीएनं नऊ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांच्या
पुनर्परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहेत. प्रश्नपत्रिकेतल्या त्रुटींनंतर ही परीक्षा
पुन्हा घेतली जात आहे. उमेदवारांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून
प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्याचं आवाहन, परीक्षार्थींना करण्यात आलं
आहे.
****
राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमधे
पारलिंगी व्यक्तींसाठी सार्वजनिक ठिकाणी वेगळी स्वच्छतागृहं बांधण्याचा निर्णय राज्य
सरकारने घेतला आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुंबईत वार्ताहरांना ही
माहिती दिली. या कामासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली असून महानगरपालिकांकडून कामाचे
प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.
****
येत्या १२ सप्टेंबरनंतर मराठा
समाज मुंबईकडे कूच करणार, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला
आहे. जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं उपोषण करत असलेले जरांगे यांनी, हैदराबाद
गॅझेटनुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप अद्याप सुरू झालं नसल्याचा आरोपही
केला आहे. शासनाकडून गावोगावी शिबिरं घेऊन दवंडी देण्याची कार्यवाही देखील झालेली नाही, तसंच राज्य
मागासवर्ग आयोगाच्या मुद्यावरही सरकारने निर्णय घेतला नसल्याचं जरांगे यांनी सांगितलं.
दोन दिवसांपूर्वी सुरू केलेले वैद्यकीय उपचार आणि पाणीही त्यांनी शुक्रवारी रात्रीपासून
बंद केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, मनोज जरांगे
यांनी केलेल्या सर्व मागण्यांची दखल राज्य सरकारनं घेतली असून, त्यांनी
उपचार घेण्यास नकार देऊन टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे
अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. ते काल अहिल्यानगर इथं माध्यमांशी बोलत होते.
न्यायालयीन प्रक्रियेत सर्व निर्णय टिकावेत म्हणून कायदेशीर बाबी तपासून त्यावर कार्यवाही
सुरू करून, प्रशासकीय स्तरावर प्रक्रियाही सुरू झाल्याचं, मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं.
****
दहीहंडीचा सोहळा काल उत्साहात
साजरा झाला. मुंबईत लालबाग आणि दादरपासून ते ठाण्यातल्या भव्य मैदानांपर्यंत सर्वत्र
ढोलताशांच्या निनादात मुलामुलींची गोविंदा पथकं दहीहंड्या फोडण्यासाठी भव्य मनोरे रचत
असल्याचं काल दिसून आलं.
युवकांनी व्यसनांपासून दूर
राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावं, दहीहंडीच्या उत्सवामधून 'नशामुक्त
महाराष्ट्र' संकल्पनेला बळकटी देण्याचं काम करावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवात केलं. त्यांनी वरळी, दादर, घाटकोपर
इथं आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. मानवी मनोरे हे संघटित प्रयत्न, समन्वय, विश्वास
आणि धैर्याचं उत्तम उदाहरण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
दरम्यान, नवी मुंबईत
ऐरोली परिसरात दहीहंडीचा मानवी मनोरा रचताना कोसळल्यानं एका ३४ वर्षीय युवा गोविंदाचा
मृत्यू झाला. तर दहीहंडीदरम्यान झालेल्या अपघातांमधे मुंबईच्या मालाडमधल्या मालवणी
भागात कच्ची भिंत पडून सात वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू झाला, तर पुण्यात
काल लोखंडी कमान कोसळून एक महिला मृत्यूमुखी पडली. या उत्सवादरम्यान मुंबईत ११८ गोविंदा
जखमी झाले. त्यापैकी ८५ जणांवर उपचार सुरू आहेत, तर ३३ जणांना उपचारांनंतर
घरी सोडण्यात आलं. ठाण्यात जखमी झालेल्या १० गोविंदांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात
आलं.
**
छत्रपती संभाजीनगरातही अनेक
ठिकाणी दहीहंडी सोहळे साजरे झाले. राजकीय तसंच सामाजिक संघटनांनी गोविंदा पथकांसाठी
मोठमोठ्या पारितोषिकांच्या रकमा जाहीर केल्या, त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये
चुरस दिसून आली. गोविंदा पथकांनी उभारलेल्या मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांचीही
मोठी गर्दी झाली होती.
**
परभणी जिल्ह्यात गोकुळाष्टमीनिमित्त
गोपाल काला आणि दहीहंडी सोहळा साजरा झाला. अनेक शाळांमधून लहान मुलांनी राधाकृष्णाच्या
वेशभूषा साकारल्या होत्या. यानंतर दहीहंडी फोडून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा
परिषदेअंतर्गत काल चार शिक्षकांना जिल्हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तर उल्लेखनीय
कामगिरी करणाऱ्या १४ उपक्रमशील शाळांचा तसंच ९ विशेष शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
****
तुळजापूर नगरपरिषदेतंर्गत
सर्व शाळा वातानुकूलित करण्यात येणार असल्याचं नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी म्हटलं
आहे. ते काल शिक्षक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. उत्तम दर्जाची शाळा
उभारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना सर्व आधुनिक सुविधा देण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील
राहणार असल्याचं गंगणे यांनी सांगितलं. यावेळी नगर परिषद शाळेतल्या २९ शिक्षकांचा सत्कार
करण्यात आला.
****
परभणीतल्या सेलू शहराच्या
सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री मेघना बोर्डीकर
यांनी दिली आहे. सेलू इथल्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाची नवीन इमारत आणि शासकीय निवासस्थानांचं
लोकार्पण केल्यानंतर त्या बोलत होत्या. प्रत्येक कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळावं, या दृष्टीनं
काम केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. नागरिकांनी स्वच्छतेला प्राधान्य देऊन आपलं
शहर कायम स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहनही बोर्डीकर यांनी
यावेळी केलं.
****
महिलांच्या आशिया चषक टी-ट्वेंटी
क्रिकेट स्पर्धेत काल दुबईत झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सात खेळाडू राखून
विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाने केवळ ५६ धावंचं लक्ष्य दिलं.
भारतीय महिला संघाने हे लक्ष्य नवव्या षटकात पूर्ण केलं. तीन खेळाडू बाद करणारी भारताची
गोलंदाज श्री चरणी प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली.
****
'चायना मास्टर्स' बॅडमिंटन
स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीच्या
अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सात्विक-चिराग
जोडीने मलेशियाच्या जोडीचा २१-१६, २१-१८, २१-११ असा पराभव केला. आज सायंकाळी होणाऱ्या अंतिम लढतीत
सात्विक-चिरागचा सामना चीनच्या जोडीशी होणार आहे.
****
हवामान
येत्या दोन दिवसात कोकणात
बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या
स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment