Tuesday, 22 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 22 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरातमधल्या एकतानगर इथं ७२वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथमच देशाच्या राजधानीबाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्यानं तो भारतीय चित्रपटसृष्टीतला ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. यामध्ये कथा, कथाबाह्य चित्रपट, चित्रपटविषयक लेखन अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीचा गौरव करण्यात येतो. एकतानगर इथं होणाऱ्या या सोहळ्याला देशभरातले नामवंत चित्रपट कलावंत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.

****

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या द्विपक्षीय आर्थिक भागीदारीत महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराची म्हणजेच एफटीएची अंमलबजावणी येत्या २० ऑक्टोबरपासून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अधिक बळकट आणि महत्त्वाकांक्षी आर्थिक भागीदारी उभारण्याच्या सामायिक कटिबद्धतेला चालना मिळेल, असं त्यांनी सांगितलं.

****

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं सुरु केलेल्या धडक कारवाईअंतर्गत गेल्या चार दिवसात १ कोटी ३६ लाख रुपयांचा संशयास्पद, भेसळयुक्त आणि अस्वच्छ खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला. यात राज्यभरात एकूण ६४ हॉटेलं आणि धाब्यांची तपासणी करुन १२ हॉटेलांचे परवाने निलंबित केले, तर ३६ हॉटेलांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. प्रतिबंधित अन्न पदार्थ पानमसाला, गुटखाविक्री, वितरण, आणि वाहतुकप्रकरणी १४ एफआयआर दाखल केले त्यात १५ व्यक्तींना अटक करुन एकूण १ कोटी ३८ लाख ७४ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

****

धाराशिव जिल्ह्यात शासकीय कार्यालयांच्या विविध योजना आणि सेवा नागरिकांपर्यंत अधिक सुलभतेने पोहचवण्यासाठी सेवा संकल्प अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय शासकीय यंत्रणांची काल बैठक घेण्यात आली. लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

****

धाराशिव जिल्ह्यात कृत्रीमरित्या फळे पिकवणाऱ्या भट्ट्या तसंच बेकरी आणि उपाहारगृहातल्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्याबाबत शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने अन्न-औषध प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला आहे. सदर आस्थापना नियमांची पायमल्ली करून चालवल्या जात असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा जन आंदोलन उभारण्याचा इशारा समितीने दिला आहे.

****

मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानास नाशिक जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत आतापर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी एक हजार ७२५ आरोग्य शिबिरांमधून, ७३ हजार ७४८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२६-२७ मधल्या पीक कापणी प्रयोगांच्या ऑनलाईन नोंदींच्या सद्यस्थितीचा बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आढावा घेतला. प्रलंबित नोंदी विहित मुदतीत पूर्ण करून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ वेळेत मिळेल, यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षतेने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

****

अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार प्रख्यात कवी तथा निवृत्त प्राचार्य विठ्ठल वाघ यांना नुकताच प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि २५ हजार रुपये, या स्वरुपाचा हा पुरस्कार गांधीवादी विचारवंत प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

****

ट्रान्सफॉर्मर बसवण्याकरता विद्युत पुरवठा बंद करण्याच्या परमिटसाठी पाच हजार रुपये लाच घेणाऱ्या वीज महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल रंगेहाथ अटक केली. नूर मोहम्मद अलीमुद्दीन सिद्दीकी असं या अभियंत्याचं नाव असून, तो जालना जिल्ह्यात बदनापूर इथं कार्यरत आहे.

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटमध्ये सुवर्ण पदकासाठी भारतीय संघाचा सामना श्रीलंकेच्या संघाशी सुरु आहे.

या स्पर्धेत काल बॅडमिंटनमध्ये भारताच्या पुरुष संघाने बांगलादेशचा 3-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आज उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना यजमान जपानशी होणार आहे. भारतीय महिला संघदेखील आज उपांत्यपूर्व फेरीत जपानविरुद्ध खेळणार आहे.

जलतरणात श्रीहरी नटराजने ५० मीटर बॅकस्ट्रोकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...