Wednesday, 30 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला सुरक्षा दलात सामावून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      दुष्काळाच्या पहिल्या यादीत नसलेल्या तालुक्यांना ट्रिगर दोन मध्ये लाभ देण्यात येणार

·      रोजगार हमी योजना विभागाकडून दुष्काळी भागासाठी ६ हजार ७२८ कोटी रुपयांचा निधी 

·      जर्मनीच्या ऑडी कारची छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा प्रकल्पात बांधणी करण्यास प्रारंभ

आणि

·      आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत ५३ पदकांसह दहाव्या स्थानावर

****

अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या उमेदवारांना राज्य पोलीस दलासह इतर सुरक्षा दलात सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. या अग्निवीरांना परीक्षा आणि प्रशिक्षणाची अट नसेल तसंच त्यांना वयोमर्यादेत चार वर्षांची सवलत दिली जाईल, असं सांगत, गरज पडल्यास अग्निवीरांसाठी अतिरिक्त पदांची निर्मिती करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

दुष्काळाच्या पहिल्या यादीत नसलेल्या तालुक्यांना ट्रिगर दोन मध्ये लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

राज्य वैरण विकास धोरणही मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. या धोरणामुळे पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार असून दुग्धव्यवसाय आणि पशुपालन या शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज इथं कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापनेला आणि त्यासाठीच्या पदांना तसंच खर्चाच्या तरतुदीला या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

'महाराष्ट्र कारागृहे सुधारसेवा अधिनियम, २०२५ मध्ये सुधारणा, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा सुधारित आकृतीबंध, तसंच महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण - २०२४ मध्ये सुधारणेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

****

राज्यात सध्या पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रबी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. राष्ट्रीय कृषि संमेलन -रब्बी अभियान २०२६ च्या दुसऱ्या दिवशी काल केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत भरणे यांनी महाराष्ट्राची भूमिका मांडली. यंदा पीक विमा योजनेत केवळ उपग्रह प्रतिमांच्या अहवालाच्या आधारे उत्पादनाचा अंदाज न घेता प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा विचार करावा, अशी मागणीही भरणे यांनी केली.

****

दुष्काळी भागातल्या नागरिकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध करून देणं, त्यांच्या हाताला काम देणं आणि कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी रोजगार हमी योजना विभागाने ६ हजार ७२८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून रोजगारनिर्मितीबरोबरच जलसंधारण, शेतीपूरक सुविधा आणि ग्रामीण पायाभूत विकासाला गती देण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली.

****

दरम्यान, दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमधल्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये, अशी सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना केली आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था- सारथीला १२२ कोटी ३४ लाख आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. या निधीतून मराठा समाजातल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आठ वसतिगृहांची उभारणी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

निवडणूक आयोगाच्या मतदारयाद्यांसंदर्भातल्या कार्यवाहीविरोधात येत्या चार ऑक्टोबरला मुंबईत एक संयुक्त मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित होते. हा मोर्चा अराजकीय असेल आणि कुठल्याही पक्षाचा नाही तर देशाचा तिरंगा ध्वज यावेळी हातात असेल, असं त्यांनी सांगितलं.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत 

**** 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण, हा याच प्रयत्नांचा भाग आहे. या धोरणाबाबत आज जाणून घेऊ..

शिक्षणव्यवस्थेत व्यापक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाननं केंद्र सरकारनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मंजूर केलं. १९८६ नंतर देशासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलं. शिक्षण अधिक कौशल्याधारित, बहुशाखीय आणि विद्यार्थीकेंद्रित करण्याचा प्रयत्न नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आला असल्याचं पंतप्रधानांनी हे धोरण जाहीर होताना सांगितलं.

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पारंपरिक १०+२ शैक्षणिक रचनेऐवजी ५+३+३+४ अशी नवीन शैक्षणिक रचना प्रस्तावित करण्यात आली आहे. या रचनेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कौशल्याधारित शिक्षण आणि अनुभवाधारित अध्ययन यावर धोरणात भर देण्यात आला आहे.  विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर त्यांच्या मातृभाषेत किंवा स्थानिक भाषेत शिक्षण देण्याला या धोरणात महत्त्व देण्यात आलं आहे.

****

जर्मनीची नामांकित लक्झरी कार कंपनी ऑडीनं आपल्या बहुप्रतीक्षित ऑल-न्यू ऑडी क्यू-3 या नव्या मॉडेलची छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा प्रकल्पात बांधणी करण्यास प्रारंभ केला आहे. ऑडीच्या प्रीमियम एसयूव्ही श्रेणीतलं महत्त्वाचं मॉडेल असलेली ही चारचाकी येत्या १६ ऑक्टोबरला भारतीय बाजारपेठेत दाखल होणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष अरोरा यांनी दिली.

****

लातूर जिल्ह्यात किल्लारी इथल्या प्रलयंकारी भूकंपाला आज ३३ वर्ष होत आहेत. ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे चार वाजेच्या सुमारास झालेल्या या साडे सहा रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे या परिसरातल्या ५० हून अधिक गावातली हजारो घरं जमीनदोस्त होऊन, मोठ्या प्रमाणावर जीवीत तसंच वित्त हानी झाली होती.

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने काल आणखी दोन सुवर्ण पदकं पटकावली. नेमबाजीत नीरु धांडा हिनं महिला ट्रॅप वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. याच प्रकारात महिला नेमबाजांच्या संघाने काल रौप्य पदकाची कमाई केली. मुष्टीयुद्धात नरेंद्र बेरवालने ९० किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. पुरुषांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत गुलवीरसिंह यानेही कांस्यपदक जिंकलं. चारशे मीटर रिले स्पर्धेत महिलांच्या संघाला सुवर्णपदक मिळालं. तर याच प्रकारात पुरुष संघाने कांस्यपदक पटकावलं. या स्पर्धेत भारत एकूण ५३ पदकांसह आता दहाव्या स्थानावर पोहचला आहे. या पदकांमध्ये सहा सुवर्ण, २१ रौप्य आणि २६ कांस्य पदकांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठीची नामनिर्देशन प्रक्रिया कालपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी १९ इच्छुक अर्जदारांनी ३० नामनिर्देशन पत्रं घेतली, मात्र काल एकाही अर्ज दाखल झाला नाही.

****

राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आपतकालीन निधीतून हेक्टरी पन्नास हजार रुपये तातडीची मदत देण्याची मागणी भारतीय किसान संघाने केली आहे. किसान संघाच्या वतीने काल राज्यातल्या सर्व तहसिल कार्यालयात तहसिलदारांमार्फत या मागणीचं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या पीक कापणी प्रयोगासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी प्रयोग पूर्ण होईपर्यंत पीक कापणी, काढणी किंवा नांगरणी करू नये, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. अशा प्रकारे पीक काढणी केल्यास वस्तुनिष्ठ नुकसानभरपाई निश्चितीसाठी आवश्यक असलेल्या पीक कापणी प्रयोगांवर परिणाम होऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी कर्डिले यांनी जिल्ह्यात उपलब्ध हिरवा तसंच वाळलेला चारा जिल्ह्याबाहेर विक्री तसंच वाहतूक करण्यास बंदी घातली आहे.

****

धाराशिव इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात काल भारतीय ज्ञानपरंपरा या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र पार पडलं. या चर्चासत्रात, पुण्याच्या हेरिटेज फाउंडेशनचे भुजंग बोबडे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्य डॉ गजानन सानप यांनी मार्गदर्शन केलं. या निमित्ताने तेर इथं हेरिटेज वॉकही घेण्यात आला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...