Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 24
September 2026
Time 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २४
सप्टेंबर २०२६ दुपारी
१.०० वा.
****
दहा दिवसांच्या गणेश मूर्तींचं उद्या विसर्जन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात विसर्जन मिरवणुका सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी उद्या सकाळी सात वाजेपासून २१ प्रमुख मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी याबाबतचे आदेश जारी केले. शहागंज, सिटी चौक, पैठण गेट, औरंगपुरा, सावरकर चौक, टीव्ही सेंटर, सेंट्रल नाका, सेव्हन हिल ते शिवाजी नगर आदी मार्ग बंद राहणार आहेत.
****
जालन्यातही गणेश विसर्जनामुळे वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले असून, उद्या सकाळी सात वाजल्यापासून गणेश विसर्जन पूर्ण होईपर्यंत विविध मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात येणार आहे. कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावं, असं आवाहन पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी केलं आहे.
****
चंद्रपूर इथं विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर एआय आणि हाय रिझोल्युशन सीसीटीव्ही सर्व्हेलन्स व्हॅनचा वापर करण्यात येणार आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे चेहरे आणि संशयित वाहनांचे क्रमांक विशेष डेटामध्ये फीड करण्यात आले आहेत. गर्दीत हे चेहरे किंवा वाहन क्रमांक आढळताच एआयच्या मदतीनं तातडीने पोलिसांना अलर्ट मिळणार असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
****
न्यूयॉर्क इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्र
महासभेच्या ८१व्या अधिवेशनात भारतासह जागतिक संस्थांनी ‘वन एस सी डी’ ही जागतिक भागीदारी सुरू केली. आरोग्य आणि कुटुंब
कल्याण मंत्रालयाच्या सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी भारताच्या राष्ट्रीय
सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहिमेत, तपासणी, लवकर निदान, समुपदेशन, उपचार आणि पाठपुराव्यावर भर दिला जात असल्याची माहिती
यावेळी दिली. तसंच या आजारावर भारतानं केलेल्या सर्वसमावेशक उपाययोजनांवर प्रकाश
टाकला. २०४७ पर्यंत सिकल सेल आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने २०२३
मध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेतद्वारे भारतानं सिकलसेल आजार
असलेल्या गरजू रुग्णांना वेळेवर निदान आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी समान, समन्वित आणि शाश्वत जागतिक उपाययोजनांसाठी आपली
कटिबद्धता अधोरेखित केली असल्याचं श्रीवास्तव यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २७ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा १३८ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
राज्यातल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर सरकारचं बारकाईने लक्ष असून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे
त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यात पीकांची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते. शेतकऱ्यांना मदतीबाबतची पहिली अधिसूचना पुढील तीन दिवसांत जारी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.
****
बीड जिल्हा रुग्णालयात काल ११ वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन
आणि सेवा संकल्प अभियान कार्यक्रम उत्साहात पार पडला. निरोगी जीवनशैलीसाठी दैनंदिन जीवनात आयुर्वेदाचा वापर करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. विविध औषधी वनस्पतींचं प्रदर्शन
यावेळी भरवण्यात आलं तसंच वनस्पतींचे उपयोग आणि
घरगुती उपचारांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
****
दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या युपीआय
व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी बीड जिल्हा व्यापारी महासंघाने केली आहे.
यासंदर्भात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. युपीआय व्यवहार हे व्यापारी आणि ग्राहकांच्या दैनंदिन
व्यवहाराचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. त्यामुळे अतिरिक्त शुल्क आकारल्यास त्याचा
आर्थिक भार व्यापारी आणि ग्राहकांवर पडण्याची शक्यता आहे. विशेषतः लहान आणि मध्यम
व्यापाऱ्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी
ते सुलभ आणि किफायतशीर ठेवावेत, अशी भूमिका महासंघाने मांडली. व्यापारी किंवा ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची स्पष्ट व्यवस्था करावी तसंच संबंधित घटकांशी
चर्चा करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी कार्याध्यक्ष अशोक शेटे यांनी केली.
****
मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू
असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षणाला बीड तालुक्यात वेग आला आहे. मतदार नोंदींमधल्या
त्रुटी आणि विसंगतींची पडताळणी करून संबंधितांची बाजू ऐकून घेण्यासाठी
सुनावण्यांना सुरुवात झाली आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी बेलवाडी आणि
म्हाळसापूर इथं प्रत्यक्ष उपस्थित राहून सुनावण्यांचा आढावा घेतला.
****
जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आज एक रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली. वुशूमध्ये रोशिबिना देवीने रौप्यपदक पटकावलं.
****
No comments:
Post a Comment