Friday, 25 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.09.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 25 September 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. राज्यभरात विसर्जन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून, नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

मुंबईतले रस्ते गणेश विसर्जनासाठी नागरिकांनी फुलून गेले आहेत. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत २४ हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत. प्रमुख विसर्जन स्थळांवर १० हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जात आहे.

चौपाटींसह ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळे आणि ३८३ कृत्रिम तलाव अशा एकूण ४५० ठिकाणी मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुण्यात मानाच्या पाचही गणपतींच्या मिरवणुका सुरु झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.

नंदुरबार शहरातल्या प्रथम मानाचा गणपती असलेल्या दादा गणपतीचा रथ दोरखंडाने ओढत मिरवणूक काढण्यात आली. हा रथ ओढण्यासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. दादा आणि बाबा गणपतींची होणारी पारंपारिक हरिहर भेट हे नंदुरबारच्या गणपती मिरवणुकीचं मुख्य आकर्षण आहे. रात्री १२ च्या सुमारास या दोन गणपतींची भेट होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर इथंही महानगरपालिकेनं विसर्जनाची सर्व तयारी केली आहे. काही मंडळांसह घरगुती गणपतींचं विसर्जन सुरु झालं असून, शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मराठवाड्यात सर्वत्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम विहिरींमध्ये गणेश विसर्जन करण्याचं किंवा मूर्ती संकलन केंद्रांवर मूर्ती जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

भारताला जागतिक उत्पादनाचं केंद्र बनवण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाला आज १२ वर्ष पूर्ण होत आहेत. प्रगत तंत्रज्ञान, जागतिक दर्जाची पायाभूत रचना, संरक्षण विनिर्माण आणि विक्रमी निर्यातीच्या जोरावर भारत आज आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने पावले टाकत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

मेक इन इंडियामुळे देशात उत्पादन वाढलं असून, भारतात गुंतवणूक आणि भारतातून होणारी निर्यातही वाढली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विविध क्षेत्रांमध्ये हा बदल स्पष्टपणे दिसून येत असल्याचं त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं.

भारत आता केवळ देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी उत्पादनांची निर्मिती करत असल्याचं,‌ वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. मेक इन इंडिया अभियानाला १२ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जारी केलेल्या संदेशात त्यांनी, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये देशात सुमारे ९ लाख कोटी रुपयांची विक्रमी थेट परकीय गुंतवणूक आल्याचं सांगितलं.

****

‘जागतिक औषधनिर्माता दिन’ आज साजरा केला जात आहे. आरोग्य व्यवस्थेत औषधनिर्मात्यांचं योगदान, रुग्णांची सुरक्षा, आणि सर्वांपर्यंत सुरक्षित आणि परवडणारी औषधं पोहोचवण्यात त्यांची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

****

माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. माथाडी नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत वाशी इथल्या कांदा बटाटा बाजारात आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या महिनाभर मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. माथाडी कामगारांना वेतन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, बोनस, घरभाडे आणि अपघात नुकसानभरपाई यांसारख्या कल्याणकारी योजनांचा लाभ तातडीने मिळावा, यासाठी मंडळांची पुनर्रचना केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची आजच्या दिवसाची सुरुवात सुवर्ण पदकाने झाली. नेमबाजीत १० मीटर एयर पिस्टल मिश्र प्रकारात कमलजीत आणि सुरुचि सिंह यांनी सुवर्ण पदक पटकावलं. अंतिम फेरीत भारतीय जोडीने ४८४ पूर्णांक सहा गुण प्राप्त केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुरुचि आणि कमलजीत यांचं अभिनंदन केलं आहे. दोन्ही खेळाडूंनी अचूक नेमबाजी आणि उत्कृष्ट समन्वयाचं सुरेख प्रदर्शन केलं, असं त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनीही दोन्ही खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.

नेमबाजीत पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशन सांघिक प्रकारात रुद्राक्ष पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदक जिंकलं.

कबड्डी मध्ये भारतीय पुरुष संघाने थायलंडचा ६६-२८ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. मुष्टियुद्ध प्रकारात पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात सचिन सिवाचने उपान्त्यपूर्व फेरी गाठली.

या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन सवर्ण, आठ रौप्य आणि नऊ कांस्य पदकांसह एकूण १९ पदकं जिंकली आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...