Monday, 7 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      २०२९ पर्यंत देशाला अंमली पदार्थमुक्त करण्याचा सरकारचा निर्धार, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून तीन वर्षांचा आराखडा जाहीर

·      पेपरफुटी रोखण्यासाठी एमपीएससीकडून संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

·      राज्यातल्या सर्व शाळांमध्ये ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश

आणि

·      सात्विक-चिराग जोडीने पटकावलं चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद

****

२०२९ पर्यंत देशाला अंमली पदार्थमुक्त करण्याचा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते काल गोव्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. भारताला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी त्यांनी तीन वर्षांचा आराखडा जाहीर केला. गुप्त माहिती आणि कार्यवाही, अंमली पदार्थ आणि कृत्रिम औषधांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर नियंत्रण, अंमली पदार्थांची मागणी आणि त्यामुळे होणारं नुकसान कमी करणं, आणि क्षमता बांधणी तसंच समन्वय, या चार प्रमुख स्तंभांवर हा आराखडा आधारित असल्याचं त्यांनी सांगितलं. ही मोहीम ५० कोटी लोकांपर्यंत पोहोचेल आणि एक लाख 'अंमली पदार्थमुक्त मित्र' निर्माण करेल, तसंच देशातल्या व्यसनमुक्ती केंद्रांची संख्याही एक हजार ७५१ पर्यंत वाढवली जाईल, असंही शहा यांनी सांगितलं.

२०१९ पासून सरकारने अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालणं, गुप्त माहितीची देवाणघेवाण करणं, आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणं आणि लोकांचं पुनर्वसन करणं यासाठीच्या उपाययोजना अधिक मजबूत केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. २०१९ पासून सरकारने अंमली पदार्थांचा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेचा प्राधान्यक्रम मानला असल्याचं सांगताना ते म्हणाले,

बाईट -  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

 

अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून, कारवाईसाठी ४६ देशांसोबत करार करण्यात आल्याची माहिती शहा यांनी दिली. २०१४ ते २०२६ या काळात ४८ लाख ६८ हजार किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

नवी दिल्लीच्या सत्य निकेतन भागात पाच मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. आत्तापर्यंत नऊ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. स्थानिक पोलीस, रुग्णावाहिका, इतर आपात्कालीन सेवा आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान घटनास्थळी मदत आणि बचावकार्य करत आहेत.

या घटनेची चौकशी करण्याचे, तसंच इमारतीच्या मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री गुप्ता यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेऊन, आवश्यक त्या सूचना दिल्या.

****

भविष्यात पेपरफुटीच्या घटना घडू नयेत, यासाठी एमपीएससी परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका निर्मितीपासून संपूर्ण परीक्षा प्रक्रियेपर्यंत आवश्यक त्या सुधारणा तातडीने लागू केल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने काल मुंबईत फडणवीस यांची भेट घेऊन एमपीएससी परीक्षा पद्धतीसंदर्भातल्या विविध मागण्या मांडल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी परीक्षाव्यवस्था अधिक पारदर्शक आणि सक्षम करण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांची माहिती दिली. औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाचीही गंभीर दखल घेण्यात आली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. या गैरप्रकारात आयोगातल्या किंवा आयोगाबाहेरच्या कोणाचाही सहभाग आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

****

शिक्षण क्षेत्रातले प्रश्न सोडवण्यासाठी केवळ आंदोलन न करता ठोस कृती कार्यक्रम राबवून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करायला हवा, असं मत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. महामंडळाच्या नागपूर आणि अमरावती विभागाच्या संयुक्त अधिवेशनात त्या काल बोलत होत्या. गेल्या काही वर्षांपासून शिक्षणव्यवस्था कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असून ती वाचवण्यासाठी शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक आणि समाजानं एकत्र येण्याची गरज आहे, असंही सुळे यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या सर्व शाळांमध्ये ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन त्यांच्या शारीरिक वजनाच्या १० टक्क्यापेक्षा जास्त नसावं, अशा सूचना शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिल्या आहेत. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात १० दिवसांचा दप्तरविरहित कालावधी आयोजित करून कृतीप्रधान उपक्रम राबवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

****

राज्यातले जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातल्या अधिकाऱ्यांचं दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीनं गुणांकन करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागानं घेतला आहे. मागच्या तीन वर्षांतल्या कामगिरीच्या आधारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे. या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचं वाटप, पुढच्या तीन वर्षांचं नियोजन आणि भविष्यातल्या नियुक्त्यांच्या वेळी केला जाईल.

****

राज्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ साठी अर्ज सादर करण्याची मुदत ११ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

****

आगामी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. सार्वजनिक गणेशोत्सव-२०२६ च्या पूर्वतयारी संदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उत्सवाच्या आनंदाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये, यासाठी पोलीस प्रशासनासह महानगरपालिका, महावितरण तसंच अन्य संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातून काटेकोर नियोजन करावं, गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या आणि नागरी सुविधांसंदर्भात अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

दरम्यान, शिरसाट यांच्यासह राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना, आगामी सणासुदीच्या काळात डीजेचा वापर करू नये, असं आवाहन केलं. 

****

जालना जिल्ह्यातही पोलिस प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करण्यावर निर्बंध घातले आहेत. यासंदर्भात जिल्हा विशेष शाखेने परिपत्रक जारी केलं असून, पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन ध्वनी प्रदूषणाच्या नियमांची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डिजेचा वापर केल्यास संबंधित मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक तेगबिर सिंह संधू यांनी केलं.

****

पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे ‌धाराशिव जिल्ह्यातली पीक परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाड दळकर यांनी काल तुळजापूर तालुक्यातल्या काक्रंबा गावाला भेट दिली. तर निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी इंदापूर, कडक नाथवाडी, बोरी, पळसप इथल्या शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पावसाच्या खंडामुळे पिकांवर झालेला परिणाम, सध्याची पीकस्थिती आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.

****

भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात सात्विक -चिरागने चीनच्या जोडीचा ११-२१, २१-१३, २१-१७ असा पराभव केला. या जोडीचं या हंगामातलं हे दुसरं विजेतेपद आहे. सिंगापूर ओपन स्पर्धेतही त्यांनी अजिंक्यपद पटकावलं होतं, तर थायलंड ओपन स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.

****

हवामान

येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...