Wednesday, 16 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      पीएफ वेतन मर्यादा १५ हजारांवरून २५ हजार रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

·      सेमिकॉन इंडिया २०२६चं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

·      २०२४ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध कन्नड अभिनेते अनंत नाग यांना जाहीर

·      मराठा आरक्षण आंदोलनतर्के मनोज जरांगे यांचा मुंबई दौरा तूर्तास स्थगित; प्रकृती खालावल्यामुळे पाटोदा इथं उपचार सुरू

·      हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन; छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

आणि

·      मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू

****

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अर्थात EPFO अनिवार्य कव्हरेजसाठीची वेतन मर्यादा दरमहा १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे ५१ लाखांहून अधिक अतिरिक्त कर्मचारी EPFO च्या अनिवार्य कव्हरेजच्या कक्षेत येण्याची अपेक्षा आहे. यामुळे सामाजिक सुरक्षा कवचाचा विस्तार, कामगारांचं औपचारिकीकरण आणि निवृत्ती लाभ अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाबद्दल अधिक माहिती देताना वैष्णव म्हणाले –

बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत सेमिकॉन इंडिया २०२६चं उद्घाटन करणार आहेत. ‘सिलिकॉन टू सिस्टीम्स: बिल्डिंग द इकोसिस्टम’ ही या तीन दिवसीय परिषद आणि प्रदर्शनाची संकल्पना आहे. या परिषदेत ५२ देशांचे प्रतिनिधी, ४०० हून अधिक कार्यकारी अधिकारी, १५० हून अधिक वक्ते आणि ६०० हून अधिक सहभागी कंपन्या सहभागी होणार आहेत. जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि स्वीडनचे सहा कंट्री पॅव्हिलियन्सही यात सहभागी असतील. भारतामध्ये सेमीकंडक्टर क्षेत्रात सहकार्य, गुंतवणूक, नवोन्मेष आणि प्रतिभा विकासाला चालना देण्यावर या परिषदेत भर दिला जाईल. सेमीकंडक्टर सामग्री, उपकरणे, चिप डिझाइन, फॅब्रिकेशन, प्रगत पॅकेजिंगपासून इलेक्ट्रॉनिक्स आणि सिस्टीम्सपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी यामध्ये प्रदर्शित केली जाणार आहे.

****

२०२४ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध कन्नड अभिनेते अनंत नाग यांना जाहिर झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हा पुरस्कार जाहीर केला. भारतीय चित्रपट क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानामुळे अनंत नाग यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.

****

पर्यावरणाचं रक्षण करुन शाश्वत विकास शक्य असल्याचं भारतानं दाखवून दिलं असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी म्हटलं आहे. ३२व्या जागतिक ओझोन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. विकासाशी तडजोड न करता माँट्रियल करारातली उद्दिष्टं भारताने वेळेआधीच पूर्ण केली आहेत असं ते म्हणाले. पर्यावरणविषयक आव्हानांचा सामना सरकार, वैज्ञानिक, उद्योगजगत आणि नागरिकांनी मिळून करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. राज्याच्या पर्यावरण आणि हवामानबदल मंत्री पंकजा मुंडे आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

****

मराठा आरक्षण आंदोलनतर्के मनोज जरांगे यांचा मुंबई दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. ते बीड जिल्ह्यात पाटोदा इथं असून, प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपोषणामुळे अशक्तपणा वाढल्याने आंदोलनस्थळीच तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांना सलाईन लावण्यात आलं. उपचार पूर्ण होईपर्यंत ते पाटोदा इथंल्या आंदोलनस्थळीच राहणार असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. आपली प्रकृती ढासळत असली तरी आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचं सांगत मराठा समाजबांधवांनी अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन करावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाच्या १४ पैकी १३ मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे, पण ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी मागे घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं. मुंबईत आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते.

****

मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पूर्ण केल्या असून, उद्या हैदराबाद मुक्तीदिनी आंदोलनाऐवजी त्याग, समर्पण आणि संघटनेचा सन्मान करूया, असं आवाहन धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. हा दिवस साधेपणाने साजरा व्हावा तसंच या ऐतिहासिक दिवशी समाजामध्ये कटुता निर्माण होईल किंवा सामाजिक वातावरणावर परिणाम होईल, अशी कोणतीही कृती करू नये असं आवाहन त्यांनी आज वार्ताहर परिषदेत केलं.

****

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होत आहे. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. ‘ऑपरेशन पोलो’ या लष्करी कारवाईद्वारे भारतीय सैन्याने हैदराबाद ताब्यात घेऊन निजामाचा पराभव केला. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भागही मुक्त होऊन, भाषेच्या आधारे तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला. मराठवाड्यात सर्वत्र मुक्तिसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे.

परभणी इथं राजगोपालचारी उद्यानात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते, धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर महात्मा फुले सभागृहात प्रसिद्ध लेखक डॉ. सुशील धसकटे यांचं ‘मराठवाडा : भाषा आणि संस्कृती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

****

बीड-पुणे रेल्वे सेवेचा उद्या बीड रेल्वे स्थानकावर शुभारंभ होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार असून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आज रेल्वे स्थानकाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातल्या भरती परीक्षा प्रक्रियेबाबत सूचना आणि अभिप्राय जाणून घेण्यासाठी शासनानं गठित केलेल्या समितीनं आज नागपूर इथं स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. आयोगाच्या भरती प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करावं, प्रश्नपत्रिकांच्या पडताळणीचं त्याचप्रमाणे ऑप्टिंग आऊट आणि पसंती क्रमांक या प्रक्रियेबाबत आयोगाने एक आदर्श संचालन प्रक्रिया एसओपी राबवावी, निकाल जाहीर झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत नियुक्ती मिळावी, अशा मागण्या या विद्यार्थ्यांनी केल्या असल्याची माहिती समितीच्या सचिव वी. राधा यांनी दिली. या समितीनं नागपूर इथं २२०० विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या तक्रारी आणि सूचना ऐकून घेतल्या.

****

मराठवाड्याचा विकास आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ‘मराठवाड्याचा विकास… तुमसे ना हो पायेगा!’ हे जनआंदोलन सुरू आहे. या जनआंदोलनाच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या २४ अपूर्ण विकासकामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करण्यात आली. या जनआंदोलन अंतर्गत उद्या छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

****

ठाणे जिल्ह्यात शहापूर इथं मुंबई-नाशिक महामार्गावर आज मालवाहू ट्रक आणि चारचाकी गाडीचा अपघात होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. कारमधले प्रवासी त्र्यंबकेश्वर इथून मुंबईला परतत असताना हा अपघात झाला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची ऐतिहासिक ओळख असलेल्या पैठणी आणि हिमरू कलेच्या संवर्धनासाठी तसंच या क्षेत्रातले कारागीर आणि विणकरांना आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक सहाय्य देण्याबाबत केंद्र सरकारकडून विविध योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी दिली. यासंदर्भात आमदार विलास भुमरे यांनी पत्राद्वारे मागणी केली होती. या पत्राच्या उत्तरात मंत्री गिरीराज सिंह यांनी, राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम आणि कच्चा माल पुरवठा नियोजन योजना राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांची मिशन सुधार अंतर्गत तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. मोहिमच्या दुसऱ्या टप्यात १ लाख ७ हजार रेशनकार्ड तपासणी करण्यात आली. अपात्र ठरलेले रेशनकार्ड रद्द न करता प्राधान्य गटात न येणारे कुटुंब या प्रकारात वर्ग करणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...