Monday, 7 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 07 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

भारत आणि फ्रान्स यांच्यातले संबंध मागील काही वर्षांत नव्या उंचीवर पोहोचले असून, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉं यांच्यासोबत दोन्ही देश विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी उभारत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पॅरिसमधल्या स्वामीनारायण हिंदू मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं. भारत-फ्रान्स सहकार्याच्या विविध पैलूंवर भाष्य करताना त्यांनी, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण, अंतराळ आणि हवामान बदल अशा विविध क्षेत्रांत दोन्ही देश नव्या वेगानं आणि ऊर्जेनं पुढे जात असल्याचं सांगितलं. ‘मेड इन इंडिया, बिल्ट इन फ्रान्स’ असलेलं हे मंदिर भारताची प्राचीन प्रतिभा आणि फ्रान्समधल्या आधुनिक अभियांत्रिकी यांचा संगम असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारत आणि फ्रान्समधली मैत्री आणि सहकार्याचं प्रतीक म्हणून हे मंदिर शतकानुशतकं उभं राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

जागतिक आरोग्य क्षेत्रात विश्वासार्ह भागीदार म्हणून भारतानं आपलं स्थान आणखी मजबूत करायला हवं, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित भारत हेल्थ जागतिक प्रदर्शनात बोलताना त्यांनी भारताच्या औषधनिर्मिती क्षेत्रातील क्षमता अधोरेखित केली. संशोधन आणि नवोन्मेषाला केंद्रस्थानी ठेवून भारतीय उत्पादनांच्या पेटंटसाठी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचंही गोयल यांनी सांगितलं. लवचिक आणि सक्षम पुरवठा साखळीचं महत्त्वही त्यांनी अधोरेखित केलं. आंध्र प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठे ड्रग पार्क विकसित करण्यावर सरकार काम करत असून, सुमारे १०० नवीन औद्योगिक पार्क उभारण्याची योजना आहे. या पार्कमध्ये औषधनिर्मिती आणि आरोग्य क्षेत्रासाठी विशेष विभाग उपलब्ध करून देता येतील, असंही त्यांनी सुचवलं.

****

राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा या समितीच्या अध्यक्ष आहेत. पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह इतर सहा सदस्यांचाही यात समावेश आहे.

****

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल काल रात्री पुण्यात जाहीर करण्यात आला. भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌च्या ‘लाजाळू’, या एकांकिकेनं ६१ व्या पुरुषोत्तम करंडकावर आपलं नाव कोरलं. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘एरर:ह्युमन डिटेक्टेड’ या एकांकिकेने सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठीचा करंडक पटकावला. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या ‘आठवडे बाजार’ या एकांकिकेला दुसरं तर मराठवाडा मित्र मंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या ‘स्कीम’ या एकांकिकेला तिसरं पारितोषिक मिळालं.

****

देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेने शनिवारी शंभरवी फेरी पूर्ण केली. या सेवेमुळे आतापर्यंत १४ हजार टन मालाची वाहतूक करण्यात आली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते १५ ऑक्टोबर २०२४ रोजी या सेवेचा प्रारंभ करण्यात आला होता. या रेल्वेमुळे शेतमालासह विविध प्रकारच्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक शक्य झाली असून ही सेवा शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी महत्त्वाची ठरत आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात उमरगा तालुक्यातल्या मुरूम इथं ‘मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबिर-२०२६’चं उद्घाटन काल राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पाच लाख रुपयांपर्यंत उपचाराची सुविधा उपलब्ध असून, मुख्यमंत्री सहायता निधीतूनही गरजू रुग्णांच्या उपचारासाठी मदत केली जात आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी २४ लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं. उमरगा इथं १०० खाटांचं महिला रुग्णालय उभारण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील, मुरूम आणि लोहारा इथं प्रत्येकी ५० खाटांची उपजिल्हा रुग्णालयं तसंच उमरगा इथं ट्रॉमा केअर सेंटर स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

****

मराठवाड्याच्या विकासासाठी तीन वर्षांपूर्वी ४७ हजार कोटी रुपयांच्या विविध पॅकेज आणि विकासकामांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र मराठवाड्याचे मूलभूत प्रश्न अजूनही कायम आहेत, असा आरोप आमदार कैलास पाटील यांनी काल धारशिव इथं पत्रकार परिषदेत केला. मराठवाड्याच्या मूलभूत प्रश्नांची सरकारला आठवण करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जनआंदोलन हाक दिल्याची माहिती पाटील यांनी दिली.

****

बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काल परळी तालुक्यातल्या भोपला इथं गणेश काळकोपरे यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन सोयाबीन नुकसानीची पाहणी केली. पावसाअभावी झालेल्या नुकसानीची तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं खासदार सोनवणे यांनी यावेळी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...