Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 September
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
विविध देशांची गरज ओळखून देशनिहाय ‘स्किल पासपोर्ट’ तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे
निर्देश
·
भरती परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी अभ्यासपूर्ण शिफारस सादर करण्याची
उच्चस्तरीय कृती दलाची ग्वाही
·
३३ टक्क्यांहून अधिक पीकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार, दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम
मुदत ३० ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण
·
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी, आज महिला क्रिकेटमध्ये सुवर्णपदकासाठी
श्रीलंकेविरुद्ध लढत
आणि
·
मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट
****
विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय ‘स्किल पासपोर्ट’ तयार करण्याचे
निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत आंतरराष्ट्रीय कामगार
गतिशीलतेवरील एकदिवसीय उच्चस्तरीय परिषदेत ते बोलत होते. राज्यासाठी जागतिक कार्यबल
गतिशीलता धोरणांतर्गत परदेशातल्या रोजगारासाठी सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करण्याच्या
सूचनाही त्यांनी दिल्या. देशातल्या युवा मनुष्यबळाची क्षमता आणि जागतिक मागणी यांची
प्रभावी सांगड घालण्याची गरज असून, त्यातून ‘सर्क्युलर मोबिलिटी ऑफ टॅलेंट’ ही संकल्पना अधिक सक्षम होईल असं ते
म्हणाले. भारताने सुमारे २८ देशांसोबत कामगार गतिशीलतेसंदर्भात
करार केले असून, अभियांत्रिकी, आरोग्यसेवा, बांधकाम आणि विविध तांत्रिक
क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाला मोठी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय
कार्यबल गतिशीलतेच्या क्षेत्रात पुढाकार घेईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
भरती परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह, कार्यक्षम आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी शासनाला अभ्यासपूर्ण
शिफारशी सादर करण्यात येतील, अशी ग्वाही भरती परीक्षा उच्चस्तरीय कृती दलाच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन
विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली. या समितीने काल छत्रपती संभाजीनगर
विभागातल्या विद्यार्थ्यांशी स्मार्ट सिटी कार्यालयात संवाद साधला, त्यानंतर झालेल्या पत्रकार
परिषदेत त्या बोलत होत्या. समितीचा विभागनिहाय दौरा येत्या ३० सप्टेंबरला पूर्ण होईल
त्यानंतर तीन महिन्यांत विद्यार्थी, पालक तसंच तज्ज्ञांकडून प्राप्त सूचनांचा अभ्यास करून शिफारसी करणार असल्याची माहिती
राधा यांनी दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा
से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या
माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून
होत आहे. ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ धोरण याचाच एक भाग आहे.
उद्योग सुरू करणं, तो चांगल्या प्रकारे चालवणं आणि त्यासंदर्भात गुंतवणूक प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी २०१४ मध्ये मेक इन
इंडिया या महत्त्वाकांक्षी उपक्रमासोबतच ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’चा प्रारंभ झाला. व्यवसायासाठी
आवश्यक परवानग्या, नोंदणी, करप्रक्रिया आणि सरकारी सेवा
या प्रक्रिया अधिक सोप्या, जलद आणि पारदर्शक करणं हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.
छत्रपती संभाजीनगर इथले उद्योजक तसंच मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज
ॲण्ड ॲग्रीकल्चर - मसिआचे माजी अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले:
बाईट -
अर्जुन गायकवाड
****
मराठवाड्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन
करण्याची सूचना पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केली. त्या काल छत्रपती
संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विभागीय आढावा बैठकीत बोलत होत्या.
पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामं गतीने पूर्ण करावीत तसंच पशुधनासाठी चाऱ्याच्या
उपलब्धतेवरही सातत्याने लक्ष ठेवण्याची सूचना बोर्डीकर यांनी केली.
****
एखाद्या गावातल्या ३३ टक्क्यांहून अधिक पीकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच
त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन
मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा
अंदाज घेतला जातो, दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या
टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची
राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती सध्या काम करत असून, तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर
राज्य सरकार निर्णय घेईल, असंही ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेवटची तारीख ३० ऑक्टोबर
ही आहे, असंही जाधव पाटील
यांनी नमूद केलं.
दरम्यान, कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही, असं प्रतिपादन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नियमाप्रमाणे पाच ऑक्टोबरनंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी
केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल, असंही त्यांनी सांगितलं.
****
राज्यात शेतीची सद्यपरिस्थिती पाहता सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी किसान सभेनं केली
आहे. या मागणीसाठी उद्या २३ तारखेला राज्यभर आंदोलनाचा इशाराही किसान सभेचे अजित नवले
यांनी दिला.
**
दुष्काळावर तत्काळ आणि व्यापक पद्धतीने उपाययोजना करण्यासाठी राज्य विधीमंडळाचं
एक आठवड्याचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे यांनी केली. तर शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयांची तत्काळ मदत
देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. त्यांनी काल नांदेड तालुक्यातल्या तळणी, एकदरा या गावांना भेटी देऊन
शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.
**
लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या
वतीने रेणापूर तहसील कार्यालयासमोर काल हलगी नाद आंदोलन करण्यात आलं.
राज्य सरकार अहवाल आणि माहितीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत
होते. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
औसा तालुक्यातल्या तावशी ताड इथं छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे
पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर कालपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात
केली. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
**
बीड जिल्ह्यात केज तहसील कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने काल बैलगाडी
मोर्चा काढण्यात आला. शासनाने दुष्काळी उपाययोजना कराव्या यासह मागण्याचं निवेदन यावेळी
तहसील प्रशासनाकडे सादर केलं.
**
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काल शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं घंटानाद
आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, प्रति हेक्टरी २५ हजार रुपये
नुकसान भरपाई द्यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी काल चार
पदकांची कमाई केली. नेमबाजीत पुरुषांच्या १० मीटर एयर रायफल सांघिक स्पर्धेत भारतीय
संघाने रौप्य पदकांची कमाई केली. रुद्राक्ष पाटील, पार्थ माने आणि हिमांशू ढिल्लन यांचा या संघात समावेश
आहे. तसंच वैयक्तिक प्रकारात हिमांशूने रौप्यपदक, तर रुद्राक्षने कांस्यपदक जिंकलं. मिश्र मार्शल आर्ट्समध्ये
सुचिका तारियालने कांस्यपदक पटकावलं.
महिला क्रिकेटमध्ये आज सुवर्णपदकासाठी भारताची लढत श्रीलंकेसोबत होणार आहे. भारतीय
वेळेनुसार सकाळी साडे दहा वाजता सामन्याला सुरुवात होईल.
या स्पर्धेत भारताने आतापर्यंत चार रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह एकूण सहा पदकं
जिंकली आहेत.
****
जालना शहरात कालपासून प्रथमच शहर बससेवेला सुरुवात झाली. शहरातल्या तीन महत्त्वाच्या
मार्गावरून या बस धावणार आहेत. दरम्यान, अंबड इथं बसस्थानक परिसरात काल पहाटेच्या सुमारास लागलेल्या
भीषण आगीत सहा दुकानं भस्मसात झाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही.
****
हवामान
मराठवाड्यात आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना
पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने
वारे वाहण्यासह, विजांच्या कडकडाटासह पावसाची
शक्यता हवामान विभागानं वतर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment