Tuesday, 29 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.09.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 29 September 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताने पाचवं सुवर्ण पदक पटकावलं. नेमबाजीत नीरु धांडा हिनं महिला ट्रॅप वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. त्याचबरोबर महिलांच्या ट्रॅप सांघिक स्पर्धेत नीरु धांडा, आशिमा अहलावत आणि मनिषा कीर यांच्या संघाने आज रौप्य पदकाची देखील कमाई केली.

बॉक्सिंगमध्ये परवीन हुडा आणि अंकुश पनघळ यांनी आपापल्या वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

या स्पर्धेत भारत एकूण सत्तेचाळीस पदकांसह आता अकराव्या स्थानावर पोहचला आहे. या पदकांमध्ये पाच सुवर्ण, एकवीस रौप्य आणि एकवीस कांस्य पदकांचा समावेश आहे.

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणार्या नीरु धांडा हिचं अभिनंदन केलं आहे. 'आयची-नागोया' इथं तिरंगा अभिमानाने फडकताना पाहणं हा अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. हा सुवर्णक्षण आणखी अनेक तरुण भारतीयांना नेमबाजीचा खेळ स्वीकारण्यास आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रयत्न करण्यास प्रेरित करेल, असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला. त्यासोबतच नीरू ढांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दलही राष्ट्रपतींनी अभिनंदन केलं.

****

देशातल्या राष्ट्रीय महामार्गांचं जाळं २०१४ मध्ये एक्क्याण्णव हजार किलोमीटर्सचं होतं ते या वर्षीच्या मार्चपर्यंत एक लाख शेहेचाळीस हजार किलोमीटर्सहून जास्त झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. ही सुमारे एकसष्ट टक्के वाढ असून, यामुळे संपर्क सुविधा आणि बाजारापर्यंतची पोहोच, यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. याशिवाय, हरित महामार्ग धोरण २०१५ नुसार या महामार्गांना हरित केलं जात असून, यासाठी महामार्गांच्या कडांना रोपं लावणं, वृक्षांचं स्थलांतर करणं आणि महामार्गांची देखभाल करणं यासाठी एक रूपरेषा तयार करण्यात आली आहे. यामधून वायु प्रदूषण आणि धुळीचा प्रभाव कमी होण्यासह स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं, हा सरकारचा उद्देश असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

'जागतिक हृदय दिन' आज पाळण्यात येतो. हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार, त्यांचा प्रतिबंध आणि त्यांचा जागतिक प्रभाव यासंदर्भात जनजगृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. हा दिवस लोकांना धोक्याची लक्षणं ओळखणं, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणं, जोखीम घटकांचं व्यवस्थापन करणं आणि वेळेवर वैद्यकीय उपचार घेणं यांची आठवण करुन देतो, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. हृदयाचं आरोग्य जपण्याच्या तसंच हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार रोखण्याच्या आपल्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. 'डोंट मिस अ बीट' अशी यंदाची या दिनाची संकल्पना असल्याचं नड्डा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं.

****

१५ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलेल्या FASTag वार्षिक पासने एक कोटी पास जारी करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर खासगी वाहनधारकांना सुलभ आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या या वार्षिक पासला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं.

****

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथं पीक परिस्थितीची  पाहणी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी, यासाठी पिकांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी नुकसानाचे पंचनामे अचूक होणं आवश्यक आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिक प्रभावीपणे मदत मिळू शकते, असं ते म्हणाले.

****

मतदार यादीची सखोल तपासणी आणि सुधारणा म्हणजेच एसआयआर मोहिमेअंतर्गत ज्या मतदारांना नोटीस बजावण्यात आली आहे, त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता आता घरीच केली जाणार आहे. यासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी - बीएलओ स्वतः मतदारांच्या घरी जाऊन कागदपत्रांची तपासणी करणार आहेत. त्यामुळे नोटीस बजावलेल्या मतदारांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कुठेही जाण्याची गरज भासणार नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

महसूल गुप्तचर संचालनालयानं सोनं तस्करीविरोधात केलेल्या देशव्यापी कारवाईत परदेशी बनावटीचं १० कोटी रुपये किमतीचं सुमारे साडेसहा किलो सोनं जप्त केलं. कुरियर नेटवर्कच्या माध्यमातून ही टोळी सोन्याची तस्करी करत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या नऊ महिन्यांत या टोळीनं सुमारे ४५० कोटी रुपये मूल्याचं ३१८ किलो सोनं तस्करी केल्याचं तपासात समोर आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...