Sunday, 27 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य, प्रत्येकानं त्यासाठी वेळ काढावा - पंतप्रधान मोदी यांचं मन की बातमध्ये आवाहन

·      दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·      दुष्काळाबाबत संवेदनशीलता बाळगण्याचं, सहकार्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

आणि

·      आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदक संख्या ३४ वर

****

जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यांनी आज ‘मन की बात’ या आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमाच्या १३८व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की –

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशात जनगणनेचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला असून ३२ कोटींहून अधिक कुटुंबांची नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली. लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम भागांतही हे काम सुरू असल्याचं सांगत, नागरिकांच्या सहभागाची उदाहरणंही त्यांनी दिली. उद्या सर्जिकल स्ट्राईकला १० वर्षं पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं, असं ते म्हणाले. दहशतवाद्यांनी भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर कठोर उत्तर मिळेल असा स्पष्ट संदेश गेल्या दशकभरात भारतानं वारंवार दिल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा एक हजार वर्षं पूर्ण झाल्याचं स्मरण मोदी यांनी केलं. सोमनाथ मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही, मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे, असं ते म्हणाले. त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्य मंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनर्उभारणीबद्दलही त्यांनी सांगितलं. आज मोढेरा हे देशातलं पहिलं सौर गाव बनल्याचं आणि सर्वांनी तिथं भेट द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. येत्या दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण त्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्त्वाचा मंत्र होता, असं सांगून, मुंबईतले समुद्रकिनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमेसह देशभरातले जलस्रोत, सार्वजनिक परिसर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं. नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं पंतप्रधान म्हणाले. नशामुक्त युवा, विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढं न्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करण्याचं उद्दिष्ट पंतप्रधानांनी सर्वांसमोर ठेवलं. सप्टेंबर महिना कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत, विविध राज्यांतल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचंही त्यांनी विशेष कौतुक केलं. गावागावांत आणि छोट्या शहरांत प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरज व्यक्त करत, यासाठी वैयक्तिक पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख त्यांनी केला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा, सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये केलं.

****

दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना मदतीपासून कुणीही वंचित राहणार नसून शेतकऱ्यांना शासनाद्वारे त्वरित दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नागपुरमध्ये वार्ताहरांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ज्या तालुक्यांची नावं यादीत समाविष्ट नाहीत तिथं पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले –

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळाच्या मुद्द्यावर प्रत्येकानं संवेदनशीलता बाळगावी. सर्वांनी आवश्यक ती मदत करावी, असं आवाहनही त्यांनी केलं. दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येईल. राज्यात पिण्याच्या पाण्याचं आरक्षण ठेवून अतिरिक्त उपलब्ध पाणी रब्बीसाठी देता येईल का याचाही प्राधान्यानं विचार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अल निनोमुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचा अभ्यास करण्यात येऊन फेब्रुवारी अखेरपर्यंत यात उच्चांकी पातळी गाठण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्राधान्यानं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं निर्णय घेण्यात येत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी संवैधानिक संस्थांना बदनाम करत आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात केली. एस आय आर सह सर्व प्रक्रिया सर्वानुमते झाल्याचं काल तीनही निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एका वृत्तपत्राच्या बातमीआधारे संवैधानिक संस्थांना काँग्रेस बदनाम करत असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. दरम्यान, दुष्काळ परिस्थितीचं संकट पडल्यानं श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावनं आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटी अकरा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

****

शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि प्लास्टिकला पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात बांबूवर आधारित अर्थव्यवस्था विकसित करण्याचं आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केलं आहे. त्यांनी आज मुंबईत आयोजित बांबू अर्थव्यवस्था आणि शाश्वतता शिखर परिषदेला संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांना सक्षम बांबू मूल्यसाखळीची केंद्रे म्हणून विकसित करता येईल आणि त्याचा स्थानिक शेतकरी आणि आदिवासी समुदायांना लाभ होईल, असं राज्यपालांनी सुचवलं.

****

जपानच्या आयची-नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं स्क्वॉशमध्ये दोन रौप्यपदकांची कमाई केली आहे. पुरुषांच्या एकेरी स्क्वॉशमध्ये भारताच्या अभय सिंगनं रौप्यपदक पटकावलं. अंतिम सामन्यात मलेशियाच्या ईन यो एनजीने अभयचा सरळ तीन गेममध्ये पराभव केला. महिलांच्या एकेरी स्क्वॉशमध्ये भारताच्या अनाहत सिंगनेही रौप्यपदक मिळवलं. अंतिम सामन्यात मलेशियाच्या सिवासंगरी सुब्रमणियमने अनाहतचा पराभव केला. महिलांच्या दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या हरिता भद्राने कांस्यपदक पटकावलं आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत एकूण ३४ पदकं आहेत.

****

वेस्ट इंडिजनं भारतासमोर पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विजयासाठी २९६

धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. तिरुवनंतपुरम इथं सुरू या सामन्यात जस्टीन ग्रीव्हजचं शतक, जॉन कँपबेलच्या ६६ धावांमुळे वेस्ट इंडिजनं ५० षटकांत सात बाद २९५ धावा केल्या. पाहुण्यांच्या आमीर जांगू यानंही अर्धशतकी खेळी केली तर कुलदिप यादवनं चार गडी बाद केले.

****

नांदेड जिल्ह्यात उद्भवलेली दुष्काळी परिस्थिती पाहता दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. त्यांनी आज नांदेड जिल्हा दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी हदगाव आणि भोकर तालुक्यात गावांना भेटी देत प्रत्यक्ष शेतीमध्ये जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. हदगावनंतर भोकर तालुक्यात मोघाळी आणि हळदा इथं सावे यांनी भेट दिली. जिल्ह्यातल्या मुदखेड आणि मुखेड या दोन तालुक्यांचाही ट्रिगर-टू अंतर्गत दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून अहवाल घेतला आहे. या दोन्ही तालुक्यांचाही समावेश केला जाईल, असा विश्वास पालकमंत्री सावे यांनी यावेळी व्यक्त केला.

****

शेतात प्रत्यक्ष न जाता ई-पिक पाहणी संकेतस्थळावर जुनी अथवा इतर ठिकाणची छायाचित्रं वापरून फसवेगिरी केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील दोन ई-पिक पाहणी सहाय्यकांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...