Tuesday, 8 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 08 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आज पाळण्यात येत आहे. यानिमित्त सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या संदेशात शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी, साक्षरता ज्ञान, संधी आणि उज्ज्वल भविष्याचे दरवाजे उघडत असल्याचं नमूद केलं. त्यांनी लोकांना शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं आणि कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्याचं आवाहन केलं. सुशिक्षित आणि सक्षम नागरिक हा विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

****

देशाच्या संरक्षण दलांसाठी विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि संरक्षण उपकरणांच्या तब्बल एक लाख १० हजार कोटी रुपयांच्या खरेदीला संरक्षण हस्तांतरण परिषदेनं मंजुरी दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या खरेदीअंतर्गत रासायनिक, जैविक, किरणोत्सर्ग आणि आण्विक रेकी वाहनं, अत्याधुनिक हलकी हेलिकॉप्टर्स, रणगाडे, रडार प्रणाली तसंच इतर महत्त्वाच्या संरक्षण उपकरणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, एकूण खरेदीपैकी ९८ टक्के खरेदी भारतीय कंपन्यांकडून केली जाणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

****

भारताला जागतिक औषधनिर्माण केंद्र बनवण्यासाठी औषधनिर्माण कंपन्यांनी विविध देशांसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारांचा लाभ घ्यावा, असं आवाहन केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी केलं. नवी दिल्लीत औषधनिर्माण क्षेत्राशी संबंधित प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुक्त व्यापार करारांमुळे वैद्यकीय उपकरण क्षेत्रात रोजगार आणि उद्योगांच्या लाखो संधी निर्माण होऊ शकतात, असं सांगत गोयल यांनी, भारताने संपूर्ण जगाला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचं लक्ष्य ठेवावं, असं आवाहन केलं.

****

स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर नोंदणीसाठीचा कालावधी आता शहरी आणि ग्रामीण भागांसाठी २५ दिवसांचा असा समान असणार आहे. केंद्र सरकारने तेल विपणन कंपन्यांना त्वरित आणि एकसमान वितरणासंदर्भात निर्देश दिले असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी समाजमाध्यमावरील संदेशांत दिली. यापुर्वी पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या तणावामुळे, हा कालावधी शहरी भागांसाठी २५ दिवस आणि ग्रामीण भागांसाठी ४५ दिवस असा ठेवण्यात आला होता.

****

चालू शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसंच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसंच विशेष मागास प्रवर्गातल्या ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झाले आहेत त्यांना चार डिसेंबरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करता येईल.

****

शहरांमधल्या वायू प्रदूषणाला आळा घालून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या प्रभावी उपाययोजनांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६ अंतर्गत अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसंच नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सात ला प्रभागस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला आहे. नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला.

****

नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत ‘किसान ड्रोन’ घटकाचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत जिल्ह्यातल्या ४८ लाभार्थी शेतकरी गटांना ड्रोन खरेदीसाठी एकूण चार कोटी ८० लाख रुपयांचं अनुदान देण्यास तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शेतीतील फवारणीसह विविध कामांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.

****

गेवराई विधानसभा मतदारसंघात पाणीटंचाई, टँकर मंजुरी, शेत पाणंद रस्ते, जमिनीचा मावेजा आणि नगर भूमापनासह विविध सार्वजनिक प्रश्नांवर आमदार विजयसिंह पंडित यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी चर्चा केली. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यास, तसंच प्रत्येक जिल्हा परिषद गटात जलस्रोत निश्चित करून तिथून टँकर भरण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिले.

****

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अवमानाचा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी लातूरमध्ये काँग्रेस, महाविकास आघाडी आणि विविध पुरोगामी संघटनांच्या वतीनं काल ‘संविधान मार्च’ काढण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मार्च मध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेच्या तिसऱ्या टप्प्यात भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी सुरू आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताच्या शीतल देवीने महिलांच्या कंपाऊंड वैयक्तिक प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...