Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 16
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
देशभरात उद्यापासून ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ या मोहिमेला सुरूवात होत आहे. ही मोहिम १७ ऑक्टोबरपर्यंत सुरू
राहील. ‘स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत, विकासित भारत’ ही या वर्षीच्या मोहिमेची संकल्पना आहे. ही संकल्पना स्वच्छ
आणि विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी सामूहिक सहभाग आणि सामायिक जबाबदारीचे महत्त्व
अधोरेखित करते. या मोहिमेत ठराविक स्वच्छता स्थळे आणि जास्त वर्दळीच्या सार्वजनिक जागांची
स्वच्छता करणे, युवकांचा सहभाग वाढवणे, तसेच विविध उपक्रमांद्वारे ‘स्वच्छतेतून समृद्धी’ला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाणार आहे.
****
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आज मुंबईत
सिद्धिविनायकाचं तसंच लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
यांच्या निवासस्थानी स्थापन गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर ते पुण्याकडे रवाना होणार आहेत.
****
परवाना बंदीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रादेशिक परिवहन
प्राधिकरण यांनी ऑटोरिक्षा आणि टॅक्सींच्या इरादापत्र तसेच बदली वाहनांच्या नोंदणीस
मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२६ किंवा त्यानंतर १८० दिवसांची मुदत
संपलेल्या इरादापत्रांना, ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज केल्यास, एकवेळची १८० दिवसांची मुदतवाढ मिळणार आहे. ९ मार्च २०२६
पर्यंत नोंदणीसाठी सादर केलेल्या, मात्र नोंदणी क्रमांक न मिळालेल्या प्रकरणांनाही ही मुदतवाढ
लागू राहणार आहे. तसेच, बदली वाहनांच्या नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात
आली आहे. निर्धारित मुदतीत नोंदणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित परवाने रद्द करण्यात
येतील, असे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने
कळवलं आहे.
****
मराठवाड्याचा विकास आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी
शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ‘मराठवाड्याचा विकास… तुमसे ना हो
पायेगा!’ हे जनआंदोलन सुरू आहे. या जनआंदोलनाच्या माध्यमातून मराठवाड्यातील २४ अपूर्ण
विकासकामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करण्यात आली. अनेक भागांतील दुष्काळी
परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. या जनआंदोलन
अंतर्गत उद्या छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात
येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत.
****
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारसह
केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली. ते आज नागपूर इथे बोलत होते. UPI व्यवहारांवरील कथित शुल्क, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि राज्यातील दुष्काळाच्या
प्रश्नावरून त्यांनी सरकारवर अनेक आरोप केले आहेत.
****
गणेशोत्सवात सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विशेष मोहीम सुरू केली आहे. ध्वनी प्रदूषणाच्या
पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातल्या २७ शहरांमध्ये विशेष निरीक्षण मोहीम राबविण्यात
येणार असून याअंतर्गत १३२ निरीक्षण केंद्रांवर ध्वनी पातळीचे मोजमाप केलं जाणार आहे.
येत्या १९, २० आणि २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी
सहा ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनी पातळीचे निरीक्षण केलं जाणार आहे.
****
हैदराबाद मुक्ती दिवस उद्या साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर
इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्या सकाळी साडे आठ वाजता कुलगुरू
डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या नंतर महात्मा फुले
सभागृहात प्रसिद्ध लेखक डॉ. सुशील धसकटे यांचे ‘मराठवाडा : भाषा आणि संस्कृती’ या विषयावर
व्याख्यान होणार आहे. हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त विभागात सर्वत्र ध्वजारोहणासह विविध
कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
****
आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं मराठा आरक्षण
आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात पाटोदा इथं ते पत्रकारांशी
बोलत होते. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी काल अंतरवाली सराटी इथून मोजक्या दहा
सहकाऱ्यांसमवेत मुंबईकडे निघालेले जरांगे, या पत्रकार परिषदेनंतर अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंद्याकडे
रवाना झाले.
****
बालकामगार निर्मूलनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
निर्माण करण्याच्या उद्देशाने नांदेड इथल्या सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे जिल्हास्तरीय
चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ‘इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी
चित्रकला, तर इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी
निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.
****
ज्येष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मी पूजनाच्या तीन दिवसीय
उत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.
गौरींचे मुखवटे, साड्या, दागदागिने, मखर आणि सजावटीच्या साहित्यासह, महानैवेद्याच्या तयारीसाठी बाजारात महिला वर्गाची गर्दी दिसून
येत आहे.
****
No comments:
Post a Comment