Sunday, 3 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ मे २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      बारावीचा निकाल जाहीर; राज्यातून ८९ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण

·      मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर अव्वल; लातूरचा निकाल सर्वात कमी ८४ टक्के

·      उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस

·      प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती

·      माजी आमदार सुरेश जेथलिया अनंतात विलीन

आणि

·      अमरावती इथं दोन कोटी तीन लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

****

राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल काल ऑनलाईन जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. यंदाही उत्तीर्ण परीक्षार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण जास्त आहे. बारावीच्या निकालाबाबत आढावा घेणारा हा वृत्तांत…

बाईट-बारावी निकाल

“कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९४ पूर्णांक १४ शतांश टक्के लागला तर, पुणे विभाग ९१ पूर्णांक २५ शतांश टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई ९० पूर्णांक ०८ शतांश टक्के, नाशिक ९० पूर्णांक ७२ शतांश टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ८८ पूर्णांक ६८ शतांश टक्के लागला आहे. तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८४ पूर्णांक १४ शतांश टक्के इतका लागला आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९० पूर्णांक ८२ शतांश टक्के इतका लागला, तर लातूर जिल्ह्याचा निकाल ८९ पूर्णांक ८२ शतांश टक्के लागला आहे. जालना जिल्ह्यात ८६ पूर्णांक १७ शतांश टक्के, नांदेड ७७ पूर्णांक ७०, बीड ९० पूर्णांक १४, परभणी ८७ पूर्णांक ६९, हिंगोली ८८ पूर्णांक ६८ तर धाराशिव जिल्ह्यात ८८ पूर्णांक ५९ शतांश टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. नांदेड जिल्ह्याचा निकाल गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत १५ टक्क्यांनी घसरल्याचं, या निकालपत्रात म्हटलं आहे.’’

 

या परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यांचं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन करत विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि कल विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी असं आवाहन केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळालं नाही त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीनं अभ्यासाला लागावं आणि यश संपादन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे. आज तीन मे पासून येत्या १७ मे पर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येतील. पुरवणी परीक्षा किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलं आहे.

****

महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरु केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या ग्राम विकास विभागाच्या वतीनं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन २०२६ या उपक्रमाचं काल मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. सध्या २० जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचं काम सुरू आहे, तर उर्वरित १६ जिल्ह्यांमध्येही लवकरच हे काम सुरु करू असं त्यांनी सांगितलं. महालक्ष्मी सरस उपक्रमाअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या उमेद या ऑनलाईन बाजारपेठेवर एक हजारापेक्षा जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी या उत्पादनांची खरेदी करावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

****

ऐतिहासिक डिजिटल जनगणनेत सहभागी होण्याचं आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांनी  केलं आहे. ते काल नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून विविध कंपन्यांबरोबर १७ लाख कोटी रुपयांचे करार केल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, विधानसभा  अध्यक्ष राहुल नार्वेकर, तसंच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी काल स्वगणना मोहिमेत स्वतःची माहिती नोंदवली. या मोहिमेत नागरिक se.census.gov.in या पोर्टलवर ३३ प्रश्नांची सहज उत्तरे देता येत आहेत.

****

केंद्र सरकारने आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशारा विषयक संदेश पोहचवण्यासाठीच्या सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा काल प्रारंभ केला. याअंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाचवेळी अनेक नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसीत केली असल्याची माहिती केंद्रीय दळणवळणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे.

****

प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, जोशी यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करत, त्यांच्या शब्दांमध्ये मातीचा सुगंध असून, त्यांच्या दूरदृष्टीमध्ये देशाच्या संस्कृतीचे कालातीत सार प्रतिबिंबित होत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान जोशी यांनी यापूर्वी मुंबईच्या केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे.

****

परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या पार्थिव देहावर काल परतूर इथल्या विठ्ठल जिनिंग परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. ६९ वर्षीय जेथलिया यांचं परवा हृदयविकाराने निधन झालं. खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार राजेश विटेकर, आमदार हिकमत उढाण, यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी. कार्यकर्ते आणि नागरिकांनी जेथलिया यांना अखेरचा निरोप दिला.

****

पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातल्या नसरापूर इथल्या बालिकेवरल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणातल्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने सात मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण परवा उघडकीस आलं. या प्रकरणी काल न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान हा खटला जलदगती न्यायालयात चालावा अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली आहे. आरोपीनं यापूर्वीही काही गुन्हे केले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मदिनाच्या वर्षाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीनं ‘गोदा ते नर्मदा’ ही जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर ते महेश्वर या प्रवासादरम्यान ही जलयात्रा काल श्री क्षेत्र वेरूळ इथं दाखल झाली. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर तसंच आमदार प्रशांत बंब यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.

****

धाराशिव जिल्ह्यात कृषीविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून एआयच्या माध्यमातून लाभार्थी वाढवण्याच्या सूचना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत. ते काल जिल्हा नियोजन समिती सभागृहात खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीत त्यांनी कृषी नियोजन, बी-बियाणे, खतसाठा आणि वृक्षलागवडीवर भर देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पोकरा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं.

****

अमरावती इथं दोन कोटी तीन लाख ७५ हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र एनवायरो पॉवर लिमिटेड इथं काल कारवाई केली. यात ३६८ किलोपेक्षा जास्त गांजा, दीड किलो चरस आणि सव्वा किलो मेफड्रीन याचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर हा मुद्देमाल नागपूर इथल्या बुटीबोरी एमआयडीसीमध्ये नेऊन इन्सिनरेटरच्या साहाय्याने नष्ट करण्यात आला.

****

अभिनेता रितेश देशमुख यांनी आपल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने काल लातूरमध्ये भव्य रोड शो काढत प्रेक्षकांशी संवाद साधला. आपल्या मूळ गावी आलेल्या रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रोड शोला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पीव्हीआर सिनेमा गृहापर्यंत झालेल्या या रोड शोमध्ये लातूरकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

****

जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक गुणवत्ता तसंच पटसंख्या वाढवण्यासाठी परभणी इथं शिक्षण आणि क्रीडा समितीमध्ये विविध विषयांचं नियोजन करण्यात आलं. जिल्हा क्रीडा आणि शिक्षण समिती सभापती वैशाली जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, शैक्षणिक गुणवत्ता तसंच पटसंख्या वाढवणं, आगामी शैक्षणिक वर्षात पाठ्यपुस्तक वाटप, गणवेश वाटप, शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा भेट, आवश्यक भौतिक सोयी सुविधा इत्यादी विषयाबाबत नियोजन करण्यात आलं.

****

परभणीचे नूतन पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांना पोलिस दलाकडून काल निरोप देण्यात आला. परदेशी यांची मुंबई इथं गुप्तवार्ता विभागाच्या उपआयुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघानं मुंबई इंडीयन्स संघावर आठ गडी आणि ११ चेंडु राखून विजय मिळवला.

या स्पर्धेत आज सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात, तर दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहेत.

****

राज्यात काल सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक पाच, छत्रपती संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक आठ, धाराशिव आणि नांदेड इथं सरासरी ४२ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...