Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 04
May 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ मे २०२६ दुपारी १.०० वा.
****
पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत
आहे. काही ठिकाणचे कल हाती येण्यास सुरुवात झाली
आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९३ जागांपैकी भारतीय जनता पक्ष १८१ जागांवर, तर सत्तारुढ
तृणमूल काँग्रेस ९२ जागांवर आघाडीवर आहे. आम जनता उन्नयन पार्टी दोन, तर भारतीय
गोरख प्रजातांत्रिक मोर्चा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया हे पक्ष सध्या
प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.
भवानीपूर मतदरासंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, भाजपच्या सुवेंदू
अधिकारी यांना मागे टाकत आघाडी मिळवली आहे. तर सुवेंदू अधिकारी हे नंदीग्राम मतदारसंघात
आघाडीवर आहेत.
आसाममधल्या एकूण १२६ जागांपैकी भाजप ७८, तर काँग्रेस आघाडी २४ जागांवर
आघाडीवर आहे. बोदोलँड पीपल्स फ्रंट १०, आसाम गण परिषद नऊ आणि ऑल इंडीया डेमोक्रॅटीक
फ्रंट पक्ष प्रत्येकी दोन जागांवर आघाडीवर आहे.
केरळ विधानसभेच्या १४० जागांपैकी काँग्रेस आघाडी ५९, मार्क्सवादी
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया २९, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया नऊ आणि केरला काँग्रेस सात
जागांवर आघाडीवर आहे.
तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांपैकी टीव्हीके १०६, एआयएडीएमके
६५ जागांवर, डीएमके ४५, तर काँग्रेस आणि पीएमके प्रत्येकी
पाच जागांवर आघाडीवर आहेत.
कोलातूर मतदारसंघातून डीएमकेचे उमेदवार मुख्यमंत्री एम के स्टॅलिन पिछाडीवर
आहेत. तर त्यांचा मुलगा उदयनीधी स्टॅलिन तिरुवल्लीकेणी इथून आघाडीवर आहे.
पुद्दुचेरी विधानसभेच्या ३० जागांपैकी ए आय एन आर सी पक्षाने एक जागा जिंकली असून, आठ जागांवर आघाडीवर आहे. भाजपने
एक जागा जिंकली असून, एका जागेवर आघाडीवर आहे.
****
राज्यातल्या बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी
देखील आज होत आहे.
बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ७० हजार ६४२ आघाडीवर आहेत. तर राहुरीत १६व्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले ८५ हजार ६३५ मतांनी आघाडीवर
असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
इतर राज्यांमधल्या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील पोटनिवडणुकीची मतमोजणी
आज होत आहे. यामध्ये गुजरातमधल्या उमरेठ, कर्नाटकातील
बागलकोट आणि दावणगेरे दक्षिण, नागालँडमधील कोरिडांग आणि त्रिपुरातील धर्मनगर यांचा समावेश
आहे.
****
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने कैलास मानसरोवर यात्रेबाबत
सीमा वादाशी संबंधित केलेले दावे भारताने फेटाळले. भारताची भूमिका सातत्यपूर्ण आणि स्पष्ट राहिली आहे असं
सांगत १९५४ पासून लिपुलेख खिंड हा कैलाश मानसरोवर यात्रेसाठी एक जुना आणि
प्रस्थापित मार्ग आहे आणि या मार्गाने ही यात्रा अनेक दशकांपासून सुरू आहे. ही
काही नवीन घडामोड नाही असं भारतानं स्पष्ट केलं आहे.
****
राज्य शासनाच्या टेक वारी 2.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचं उद्घाटन
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. आजच्या काळात ज्याला एआय समजतं,
तो साक्षर म्हणण्याची वेळ आली असून, अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी
यावेळी केलं. नागरिकांचं जीवन सुकर करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी तंत्रज्ञानाचा योग्य
वापर करावा, त्यासाठी आपण या टेक वारी मध्ये सहभागी होत असल्याचं ते म्हणाले.
****
नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत वेगानं
आणि सखोल पद्धतीनं करण्यासाठी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची घोषणा
केली आहे. या पथकात पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली
सहा पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपासात कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि
पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, या उद्देशानं हे पथक काम करेल. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला
आयोगानं स्वतःहून दखल घेतली असून, आयोगानं या घृणास्पद गुन्ह्याचा तीव्र शब्दात निषेध केला
आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
****
दरम्यान, या प्रकरणातला आरोपी
भीमा कांबळे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नांदेड इथल्या अखिल भारतीय
ब्राह्मण महासंघ आणि राजकीय - सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिकारी
राहुल कर्डिले यांची या संघटनांच्या शिष्टमंडळाने आज भेट घेऊन मागणीचं निवेदन दिलं.
****
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या
प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून तीन किलो ३४८ ग्रॅम हायड्रोपोनिक
गांजा जप्त करण्यात आला. बेकायदेशीर बाजारातील त्याची अंदाजे किंमत एक कोटी १७ लाख रुपये आहे.
बँकॉकहून पुण्यात येणाऱ्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी
केल्यावर सहा पारदर्शक पाकिटांमध्ये हा अंमली पदार्थ लपवल्याचं उघडकीस आलं.
****
No comments:
Post a Comment