Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
दहशतवाद हे संपूर्ण मानवतेसमोरचं गंभीर आव्हान असून, त्याविरोधातल्या लढ्यात केवळ कृती आणि प्रतिक्रिया पुरेशा
नाहीत, तर दहशतवादाला मिळणारा निधी, भरती, कट्टरतावाद आणि सुरक्षित आश्रयस्थळं यांचं संपूर्ण जाळं उद्ध्वस्त
करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. किर्गिझीस्तानची राजधानी
बिश्केक इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या २६व्या शिखर परिषदेत ते आज बोलत होते. पश्चिम
आशियातल्या तणावपूर्ण स्थितीचा उल्लेख करत, सर्व तणाव आणि संघर्षांचं निराकरण रणांगणावर नव्हे, तर संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच होऊ शकतं, अशी भारताची सातत्यपूर्ण भूमिका असल्याचं पंतप्रधानांनी
सांगितलं. शांघाय सहकार्य संघटनेच्या चौकटीत स्थापन केली जात असलेली केंद्रं म्हणजे
सुरक्षा धोके, संघटित गुन्हेगारी, माहिती सुरक्षा आणि अंमली पदार्थांसारख्या आव्हानांना
सामोरं जाण्यासाठीचं सकारात्मक पाऊल आहे, असं मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केलं.
****
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत भारताच्या सात
पूर्णांक आठ टक्के जीडीपी विकासदराचं स्वागत केलं असून, देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. हा विकासदर देशाची सामूहिक शक्ती
आणि नागरिकांच्या कठोर परिश्रमाचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते
म्हणाले,
बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
केंद्रीय गोबरधन योजना आजपासून
लागू झाली. ही योजना एकूण तेवीस हजार सातशे एकतीस कोटी रुपये खर्चाची आहे. देशात काँप्रेस्ड
बायोगॅसचं उत्पादन आणि वापर वाढवण्याच्या दृष्टीनं महत्वाची असलेली ही योजना २०३५-३६
पर्यंत लागू रहाणार आहे. मागच्या महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं या योजनेला मंजुरी
दिली होती.
****
राज्यात येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत
महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार असून, या कालावधीत वनहक्क पट्टे मिळालेल्या आदिवासी बांधवांना त्यांच्या
जमिनीचे ७/१२ आणि ८-अ उतारे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. महसूल
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली.
जमिनीच्या हक्काची नोंद अधिकृत अभिलेखात झाल्यानंतर संबंधित आदिवासी शेतकऱ्यांना केंद्र
आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठी
ओढ दिली असून, पिकांची अवस्था चिंताजनक बनली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये तातडीने शास्त्रीय पद्धतीने पीक पाहणी
करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करण्याची सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी
जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे केली आहे. सर्व तालुक्यांमध्ये कृषी विद्यापीठातले संबंधित
शास्त्रज्ञ, पीकशास्त्रज्ञ, हवामानशास्त्रज्ञ, तसंच महसूल आणि कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांची संयुक्त पथकं
नियुक्त करावीत, या पथकांनी संभाव्य उत्पादनातली
घट, तसंच पिके वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या
तातडीच्या उपाययोजनांची माहितीही अहवालात नमूद करावी, असंही पाटील यांनी सांगितलं आहे.
****
धाराशिव इथल्या शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या बालरोगचिकित्सा विभागात अत्याधुनिक ‘मॉड्युलर पेडियाट्रिक
इंटेन्सिव्ह केअर युनिट’ उभारण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि साधनसामग्री खरेदीस
आठ कोटी ५५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे गंभीर आजारांनी
बाधित बालरुग्णांना अधिक प्रगत आणि दर्जेदार अतिदक्षता उपचाराची सुविधा आता धाराशिवमध्येच
उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने काल याबाबतचा शासन निर्णय
जारी केला.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं आजपासून, तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला, हे विशेष आरोग्य अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये येत्या शंभर
दिवसात, ३० वर्षांवरच्या सगळ्या महिला आणि
पुरुषांची तपासणी करून असंसर्गजन्य आजारांचं निदान केलं जाणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व
नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील
यांनी केलं आहे.
****
महसूल गुप्तचर संचालनालयाने गेल्या काही दिवसांत देशभरात
गुप्तचर माहितीवर आधारित केलेल्या अनेक कारवायांमध्ये एकूण ६५ कोटी रुपयांहून अधिक
किमतीचं ४२ किलोहून अधिक परदेशी बनावटीचं सोनं आणि सुमारे दहा किलो चांदी जप्त केली
आहे.
****
No comments:
Post a Comment