Friday, 1 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      ६७ वा महाराष्ट्र दिन ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

·      महाराष्ट्रात प्रत्येकाने मराठी शिकावी; पण भाषेच्या आधारावर हिंसा अमान्य-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या स्व-गणेनेनं जनगणनेला औपचारिक प्रारंभ 

·      राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा उद्या ऑनलाईन निकाल

आणि

·      परतूरचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांचं निधन

****

महाराष्ट्र दिन राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. राज्याचा मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ मुंबईच्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. मुंबईच्या विधानभवनात विधान परिषद सभापती राम शिंदे आणि उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं.

****

मुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक, मुंबई इथं आज पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. मराठी बांधव देशाच्या कुठल्याही राज्यात असल्यास तिथल्या विकासात भर घालताना दिसतो, याकढे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकायला हवी, पण भाषेच्या आधारावर हिंसा, वाद मान्य नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले….

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील थेड जोडमार्ग- मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सुमारे साडे १३ किलोमीटर लांबीच्या या नवीन मार्गामुळे मुंबई आणि पुण्यादरम्यानच्या प्रवासाचं अंतर ६ किलोमीटरनं कमी होईल, त्यामुळे प्रवासाच्या वेळेतही साधारण २० ते ३० मिनिटांची बचत होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

****

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ठाणे जिल्हा मुख्यालयात तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड इथं ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या…

बाईट- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

 

जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, लातूर इथं शिवेंद्रसिंहराजे भोसले, परभणी इथं मेघना साकोरे-बोर्डीकर, हिंगोली इथं नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते, नांदेड इथं अतुल सावे तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. धाराशिव जिल्ह्याचं मागासलेपण दूर करून, आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न होत असल्याचं सरनाईक म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात शिरसाट म्हणाले..

बाईट- पालकमंत्री संजय शिरसाट

****

'जनगणना २०२७'अंतर्गत महाराष्ट्रात पहिल्या डिजिटल जनगणनेचा औपचारिक प्रारंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी स्व-गणेनेनं केला. आज मुंबईत लोकभवनात या प्रक्रियेला प्रारंभ करतांना, राज्याच्या स्थापनादिनी जनगणना सुरु होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. राज्यातल्या जनतेला जनगणनेच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं. ही स्व-गणना येत्या १५ मे पर्यंत चालणार असून त्यानंतर जनगणना कर्मचाऱ्यांद्वारे, घरोघरी जाऊन जनगणना होईल. राज्यात २ लाख, ६० हजार कर्मचारी जनगणना करणार आहेत.

****

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात आजपासून ९९३ रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचे दर जैसे थे कायम आहेत. यासह, सर्वसामान्य जनतेसाठी पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलच्या किरकोळ दरातही कोणताही बदल झाला नसल्याचं इंडियन ऑइल कोर्पोरेशन लिमिटेडनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

एप्रिल महिन्यात जीएसटी, अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या एकूण संकलनात आठ पूर्णांक सात टक्के वाढ होऊन ते सुमारे दोन लाख ४३ हजार कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं आज जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे. यापूर्वी, गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात जीएसटीची सर्वाधिक वसुली नोंदवली गेली होती.

****

राज्य शिक्षण मंडळाच्या, इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, दोन मे रोजी ऑनलाईन जाहीर होत आहे. मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी ही माहिती दिली. maharesult.nic.in, maha hssc board.in, आणि hscresult.mkcl.org या संकेतस्थळांवर दुपारी एक वाजता निकाल बघता येईल. गुण पडताळणीसाठी परवा तीन मे पासून अर्ज करता येतील.

****

जालना जिल्ह्यातल्या परतूर-मंठा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया याचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते, परतूर नगर पालिकेवर त्यांची दीर्घ काळ एकहाती सत्ता होती. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी नऊ वाजता परतूर इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं आगामी शैक्षणिक सत्र नियोजन जाहीर झालं आहे. विद्यापीठ संलग्न असलेल्या बीड, धाराशिव, जालना, आणि छत्रपती संभाजीनगर या चार जिल्ह्यांतील महाविद्यालयांना १४ जूनपर्यंत उन्हाळी सुटी आहे. नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ १५ जूनपासून होऊन, ३१ जुलैपर्यंत पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. "आविष्कार" स्पर्धा २९ - ३० जुलै दरम्यान होईल, "केंद्रीय युवक महोत्सव" ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान, "दीक्षांत समारंभ" ऑक्टोबर महिन्यात, प्रथम सत्र परीक्षा २१ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर दरम्यान होईल, तर दुसऱ्या सत्राची सुरुवात १६ डिसेंबरपासून होईल. त्यानंतर दुसरा लोककला महोत्सव १२ - १३ जानेवारी दरम्यान आणि वार्षिक परीक्षा नऊ एप्रिल ते १९ मे २०२७  दरम्यान होईल.

****

अंमली पदार्थ नियंत्रण विभागा-एन.सी.बी.नं अंमली पदार्थ तस्करीच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करत मुंबई इथं तब्बल एक हजार ७४५ कोटी रुपये किमतीचं ३४९ किलो उच्च दर्जाचं कोकेन जप्त केलंले आहे. एन.सी.बी.नं एका छोट्या साठ्यावरून माग काढत संपूर्ण संबंधित साखळीचा छडा लावला. या अभूतपूर्व यशाबद्दल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एन.सी.बी.चं अभिनंदन केलं आहे.

****

राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवर प्रवाशांना ‘नाथजल’चं पिण्याचं थंडगार पाणी केवळ १५ रुपयांना मिळालं पाहिजे. किंमत वाढवून त्याची विक्री होताना आढळल्यास संबंधितांचा विक्री परवाना रद्द होईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. लोणावळा बसस्थानकाला भेट देऊन प्रवासी सेवा-सुविधा पाहणी तसंच प्रवाशांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

****

कामगार दिन आज साजरा केला जातो. धाराशिव नगर परिषदेत आजच्या कामगार दिनानिमित्त नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नमस्ते योजनेअंतर्गत सुरक्षा साधनांचं वाटप करण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी तसंच खताची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या विशेष प्रयत्नाने हिंगोलीचे 'यलो गोल्ड' म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या हळदीची पाकीटं उपस्थित मान्यवरांना भेट देण्यात आली.

****

राज्यात आज सर्वाधिक ४४ पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक पाच, छत्रपती संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक आठ, धाराशिव आणि नांदेड इथं सरासरी ४२ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...