Saturday, 2 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      ६७ वा महाराष्ट्र दिन काल राज्यभरात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा

·      महाराष्ट्रात प्रत्येकाने मराठी शिकावी; पण भाषेच्या आधारावर हिंसा अमान्य-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      पहिल्या डिजिटल जनगणनेला राज्यपालांच्या स्व-गणेनेनं औपचारिक प्रारंभ

·      शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुण्यात आयोजन

आणि

·      राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल

****

६७ वा महाराष्ट्र दिन काल राज्यभरात उत्साहात साजरा झाला. राज्याचा मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ मुंबईच्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. मुंबईच्या विधानभवनात विधान परिषद सभापती राम शिंदे आणि उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं.

****

मुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना मुंबईत हुतात्मा चौक स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. मराठी बांधव देशाच्या कुठल्याही राज्यात असल्यास तिथल्या विकासात भर घालताना दिसतो, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकायला हवी, पण भाषेच्या आधारावर हिंसा, वाद मान्य नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले…

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील थेड जोडमार्ग- मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सुमारे साडे १३ किलोमीटर लांबीच्या या नवीन मार्गामुळे मुंबई पुणे प्रवासाच्या वेळेत साधारण ३० मिनिटांची बचत होणार आहे.

****

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ठाणे जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. मराठवाड्यात काल झालेल्या ध्वजारोहणाचा हा संक्षिप्त आढावा:

बाईट-महाराष्ट्र दिन

 

मराठवाड्यात महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड इथं ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या…

बाईट- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

 

जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात मुंडे यांनी, ‘माझी वसुंधरा’ अभियान, ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, तसंच विविध विकास प्रकल्पांमुळे जालना जिल्ह्याच्या प्रगतीला गती मिळत असल्याचं नमूद केलं.

छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी केलेल्या भाषणात शिरसाट म्हणाले…

बाईट- पालकमंत्री संजय शिरसाट

 

परभणी इथं मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पोलिस पथ संचालनानंतर पालकमंत्री बोर्डीकर यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या. बालविवाह प्रतिबंधक जनजागृती चित्ररथाचं उद्घाटन तसंच लघु चित्रपटाचं प्रकाशनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. हिंगोली जिल्ह्यासाठी विविध राबवण्यात येत असलेल्या विकास योजनांबाबतची माहिती पालकमंत्री झिरवाळ यांनी यावेळी दिली.

लातूर इथं शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. याप्रसंगी पोलीस, प्रशासकीय सेवा, क्रीडा आणि युवा जिल्हा पुरस्कार तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारही पालकमंत्र्यांनी प्रदान केले. सायबर पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचं लोकार्पणही पालकमंत्र्यांनी केलं.

धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. धाराशिव जिल्ह्याचं मागासलेपण दूर करून हा जिल्हा आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं सरनाईक यांनी नमूद केलं. ते म्हणाले.

बाईट- पालकमंत्री प्रताप सरनाईक

 

नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम पार पडले. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रग्णालयात नव्याने बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक एमआरआय मशीनचं लोकार्पणही पालकमंत्री सावे यांच्या हस्ते करण्यात आलं.

छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.’’

महाराष्ट्र दिनाच्या विशेष ध्वनिचित्रासाठी मराठवाड्यातल्या सर्व प्रतिनिधींसह हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर

****

'जनगणना २०२७'अंतर्गत महाराष्ट्रात पहिल्या डिजिटल जनगणनेचा काल मुंबईत लोकभवनात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी स्व-गणेनेनं औपचारिक प्रारंभ केला. राज्यातल्या जनतेला जनगणनेच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं. ही स्व-गणना येत्या १५ मे पर्यंत चालणार असून त्यानंतर कर्मचाऱ्यांद्वारे, घरोघरी जाऊन जनगणना होईल. राज्यात २ लाख, ६० हजार कर्मचारी जनगणना करणार आहेत.

****

शंभरावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे इथं होणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं आहे. काल पुणे इथं, बाल पुस्तक जत्रेचं उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषेचा गौरव आणि साहित्याचा जागर करणाऱ्या या ऐतिहासिक संमेलनाबाबत, आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही वेगाने सुरू असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

****

यंदाच्या इफ्फी चित्रपट महोत्सवासाठी संचालक म्हणून प्रख्यात चित्रपट निर्माते - दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती झाली आहे. दरवर्षी गोव्यात भरणाऱ्या या महोत्सवाचं हे ५७ वं वर्ष आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सोबतीनं महोत्सव आयोजनाची संधी मिळाल्याबद्दल गोवारीकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

****

राज्य शिक्षण मंडळाच्या, इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होत आहे. maharesult.nic.in, maha hssc board.in, आणि hscresult.mkcl.org या संकेतस्थळांवर दुपारी एक वाजता निकाल बघता येईल. गुण पडताळणीसाठी उद्या तीन मे पासून अर्ज करता येतील.

****

जालना जिल्ह्यातल्या परतूर-मंठा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया याचं काल सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी नऊ वाजता परतूर इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

****

जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. ‘रायझिंग जालना २०२६’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी काल त्या बोलत होत्या. नवीन गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून विकासाला गती देण्याबरोबरच ‘Ease of Doing Business’ साठी जालना आदर्श जिल्हा बनवण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

****

धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन पीसीआर मॉड्युलर लॅब तसंच स्किल लॅबचं काल पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. जिल्हा पोलीस दलात दाखल विविध अत्याधुनिक वाहनांचं पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. जिल्ह्यातील नागरिकांनी डिजिटल स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असं आवाहनही सरनाईक यांनी केलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी तसंच खताची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.

****

राज्यात काल सर्वाधिक ४४ पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक पाच, छत्रपती संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक आठ, धाराशिव आणि नांदेड इथं सरासरी ४२ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...