Wednesday, 2 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.09.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 02 September 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

सध्याच्या सात ते आठ टक्के विकास दराच्या पलीकडे जाण्याची भारताची क्षमता असल्याचं मत जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेतल्या ॲशविले इथं जी-२० अर्थमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जागतिक ऊर्जा दबाव, व्यापारातली अनिश्चितता आणि एल निनोचा प्रभाव असूनही, भारताची सध्याची आर्थिक कामगिरी मजबूत असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताच्या  सेवा आणि निर्यातीमधली वाढ तसंच सातत्यपूर्ण गुंतवणुकीचा बंगा यांनी यावेळी उल्लेख केला.

**

दरम्यान, या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल युरोपीयन युनियनचे अर्थ विभागाचे आयुक्त वाल्डिस डोम्ब्रोव्स्कीस यांची भेट घेतली. भारत-युरोपियन युनियन आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्यावर यावेळी चर्चा झाली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघराज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना पंतप्रधानांनी मांडली होती, त्या अनुषंगाने ही पहिलीच विभागीय परिषद आहे. जल पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, पाणी साठवण्यासाठी लोकांचा सहभाग, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची शाश्वतता आणि जल जीवन मिशनची दुसरी आवृत्ती या चार प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं.

****

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल प्लाझावरील कथित फसवणुकीच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय-ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि कोलकाता इथल्या १४ ठिकाणी छापे टाकले. डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे गोळा करणं, लाभार्थ्यांची ओळख पटवणं आणि गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा माग काढणं, हे या छाप्यांचं उद्दिष्ट आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याचं ईडीनं म्हटलं आहे.

**

दरम्यान, अवैध सट्टेबाजी रोखण्यासाठी ईडीनं महाराष्ट्रासह १२ राज्यात शोध मोहीम सुरु केली आहे. यामध्ये राज्यातल्या पाच कंपन्यांच्या परिसरात शोध घेतला जात आहे. या कंपन्यांनी कॅश मॅनेजमेंट सिस्टीम एजंट, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी यांच्यामार्फत सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रूपांतर केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नेपाळमधल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अकराशेच्या वर गेली आहे. नेपाळकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण एक हजार ११४ जणांचे मृतदेह आतापर्यंत सापडले आहेत. सर्वाधिक मृतदेह दक्षिण चितवन जिल्ह्यात, त्यानंतर नवलपरासी पूर्व जिल्ह्यात सापडले आहेत. सरकारी कर्मचारी, सुरक्षा दलाचे जवान, लोकप्रतिनिधी, परदेशी नागरिक, परदेशी पर्यटकांसोबत असलेले नेपाळी नागरिक, स्थानिक रहिवासी आणि जलविद्युत प्रकल्पांवरील कामगार अशा सुमारे चार हजार लोकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान, पुराचा फटका बसलेल्या ११ जलविद्युत प्रकल्पांमधून बेपत्ता झालेल्या अनेक लोकांशी कुठलाच संपर्क होऊ शकला नसल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे.

****

चारधाम यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात केदारनाथला जाणाऱ्या भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा १५ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी तिकीट नोंदणी खिडकी सात सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याचं उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणातर्फे कळवण्यात आलं आहे. तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि बुकिंग व्यवस्था सुव्यवस्थित करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात १५-१५ दिवसांच्या कालावधीसाठी टप्प्याटप्प्याने तिकिटं उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

****

राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा लक्षणीय कमी राहिलं आहे. कोकण विभागात सरासरीच्या ६८ टक्के, पुणे विभागात ४९ पूर्णांक आठ, नागपूरमध्ये ४६ पूर्णांक चार, नाशिकमध्ये ४२ पूर्णांक नऊ टक्के पाऊस नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर विभागात ५६ पूर्णांक पाच मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या २९ पूर्णांक दोन टक्के, तर अमरावती विभागात केवळ ४८ पूर्णांक सात मिलिमीटर म्हणजे २१ टक्के पाऊस झाला. त्यामुळे ऑगस्टमध्ये अमरावती विभागात पावसाची सर्वाधिक तूट राहिली.

****

आगामी गणेशोत्सवात मुंबईत सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेश मुर्त्यांचं विसर्जन कृत्रिम तलावात करणं बंधनकारक असल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं विसर्जनासाठी २८१ कृत्रिम तलावांव्यतिरिक्त ४४ समुद्र किनारे आणि जेट्टी तसंच २४ नैसर्गिक तलावांची व्यवस्था केली आहे. याप्रमाणे एकूण ३४८ विसर्जन स्थळं असतील. नागरिकांना कृत्रिम तलावांची माहिती क्यूआर कोड आणि गूगल मॅपच्या आधारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

****

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतने पुरुष एकेरीत चीनच्या ची यू जेनचा २१-१६, २१-१५ असा पराभव करत दुसर्या फेरीत प्रवेश केला. तर पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात लक्ष्य सेनचा कॅनाडाच्या खेळाडूने पराभव केल्याने तो स्पर्धेबाहेर गेला आहे. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्टो, थायलंडच्या जोडीला हरवून पुढच्या फेरीत गेले आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...