Wednesday, 2 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 02 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघराज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना पंतप्रधानांनी मांडली होती, त्या अनुषंगाने ही पहिलीच विभागीय परिषद आहे. जल पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, पाणी साठवण्यासाठी लोकांचा सहभाग, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची शाश्वतता आणि जल जीवन मिशनची दुसरी आवृत्ती या चार प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं.

****

कांद्याच्या हंगामी भाववाढीला नियंत्रित करण्यासाठी सरकारने कांदा एक्सप्रेस आणि रस्ते वाहतुकीद्वारे राखीव साठ्यातील कांदा टप्प्याटप्प्याने आणि नियोजित पद्धतीने बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. कांद्याची सर्वत्र उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ३० हून अधिक ट्रक रवाना करुन १९ शहरांमध्ये किरकोळ बाजारात कांदा उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न वाढवण्यात आले असल्याची माहिती, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिली आहे.

****

राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा लक्षणीय कमी राहिलं आहे. कोकण विभागात सरासरीच्या ६८ टक्के, पुणे विभागात ४९ पूर्णांक आठ, नागपूरमध्ये ४६ पूर्णांक चार, नाशिकमध्ये ४२ पूर्णांक नऊ टक्के पाऊस नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर विभागात ५६ पूर्णांक पाच मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या २९ पूर्णांक दोन टक्के, तर अमरावती विभागात केवळ ४८ पूर्णांक सात मिलिमीटर म्हणजे २१ टक्के पाऊस झाला. त्यामुळे ऑगस्टमध्ये अमरावती विभागात पावसाची सर्वाधिक तूट राहिली.

****

राज्यात सॉईल टू सिल्क आत्मनिर्भर रेशीम ग्राम; या संकल्पनेच्या माध्यमातून रेशीम शेतीची लागवड ते मूल्यवर्धित उत्पादन आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली. या प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. यामुळे उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यासोबतच गुणवत्तेत सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेशी थेट जोडणं शक्य होईल. प्रगत रेशीम गावांना रोल मॉडेल रेशीम ग्राम म्हणून विकसित करून त्यांची यशोगाथा राज्यातल्या इतर गावांपर्यंत पोहोचवण्यात येईल. यातून राज्यात रेशीम शेतीची नवी चळवळ उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे अशी माहिती सावकारे यांनी दिली.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदासाठीच्या पेपरफुटी प्रकरणातली आरोपी ऋतुजा पाटील हिला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल नंदुरबार इथून अटक केली. फुटलेल्या २९४ प्रश्नांपैकी ७७ प्रश्न हे प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेतले होते, असं तपासादरम्यान समोर आलं होतं. तसंच, सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर आल्यामुळे संशय येऊ नये, यासाठी मुद्दाम १० उत्तरं चुकवण्याचा सल्ला आरोपीनं ऋतुजाला दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

विविध नामांकित खाद्यपदार्थ कंपन्यांच्या पॅकेटवरील मुदत समाप्ती तारीखेमध्ये फेरफार करून वाढीव मुदत समाप्ती तारीख टाकणा-या एका टोळीवर नवी मुंबई गुन्हे शाखेनं तसंच अन्न आणि औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई केली. तब्बल पाच दिवस चाललेल्या झाडाझडतीनंतर तुर्भे पोलीस ठाण्यात १३ व्यक्ती आणि कंपन्यांविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. विभागाने काल पानदरीबा इथल्या राजेश्वरी प्लास्टिक या प्रतिष्ठानावर केलेल्या धडक कारवाईत तीन हजार २५० किलोपेक्षा अधिक प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करण्यात आलं. संबंधित दुकानावर २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरात विद्यार्थ्यांना एका संकुलातून दुसऱ्या संकुलात तसंच प्रशासकीय इमारतीत जाणं सुलभ व्हावं, यासाठी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने ‘गोल्फ कार’ ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही कार बॅटरीवर तसंच सौरऊर्जेवरही चार्ज करता येणार असल्यानं,  विद्यार्थ्यांची ये-जा अधिक सुलभ होण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन मिळणार आहे.

****

लातूर जिल्ह्यात कालपासून हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सुरू झाली. जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या महामार्गांवर विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली जात असून, हेल्मेट घालून नियमांचं पालन करणाऱ्या दुचाकीस्वारांचं पोलिस पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहेत.

****

माता रमाई घरकुल योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेतल्या लाभार्थ्यांनी आपल्या घरावर योजनेचा लाभ घेतल्याचा स्पष्ट फलक लावल्यानंतरच त्यांना योजनेचा शेवटचा हप्ता अदा करण्यात यावा, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे सभापती अनिल मकरिये यांनी दिले. काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...