Sunday, 1 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.02.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 February 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार

·      राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा शपथविधी, उत्पादन शुल्क, क्रीडा खात्याचा पदभार

·      बार कौन्सिलच्या वकील प्रशिक्षण अकादमीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

·      देशामध्ये आणखी दोन नव्या पाणथळ जागांना ‘रामसर’ स्थळांचा दर्जा

आणि

·      पाचव्या टी – ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर ४६ धावांनी विजय

****

आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत सलग नवव्यांदा हा अर्थसंकल्प सादर करतील. देशभरातल्या विविध महाविद्यालयांच्या तीस विद्यार्थ्यांना लोकसभेच्या प्रेक्षक दीर्घेत बसून ही अर्थसंकल्पाचं सादरीकरण पाहता येणार आहे. त्यानंतर हे विद्यार्थी अर्थ मंत्रालयाला भेट देऊन, मंत्रालयातल्या कामकाजाची प्रक्रिया जाणून घेणार आहेत.

****

राज्याच्या, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी काल शपथ घेतली. मुंबईत लोकभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. लोकभवनात अत्यंत साधेपणानं पार पडलेल्या या शपथग्रहण कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातले सदस्य उपस्थित होते.

सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्यक विकास आणि औकाफ ही खाती सोपवण्यात आली आहेत.

**

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुनेत्रा पवार, जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजित पवार यांची स्वप्न पूर्ण करतील, असा विश्वास पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात व्यक्त केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या.

**

या शपथविधीवर काँग्रेसनं प्रश्न उपस्थित केले. सरकारकडे बहुमत असताना अशाप्रकारची घाई अनाकलनीय असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. तर, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घाईगडबडीने होत असल्याची प्रतिक्रिया, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.

**

दरम्यान, या शपथविधीपूर्वी मुंबईत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधीमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या ठरावाची माहिती दिली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची प्रक्रिया सुरू झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

**

सुनेत्रा पवार यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा हा संक्षिप्त आढावा…

बाईट-सुनेत्रा पवार पॅकेज

तत्कालीन उस्मानाबाद आणि आता धाराशिव जिल्ह्यात असलेल्या तेर इथं, स्वातंत्र्यसैनिक बाजीराव पाटील आणि द्रौपदी पाटील या दाम्पत्याच्या पोटी, १८ ऑक्टोबर १९६३ रोजी जन्मलेल्या सुनेत्राताई यांचा, १९८५ साली अजित पवार यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर काटेवाडीत आपल्या घरच्या शेतीत रमलेल्या सुनेत्रा पवार यांनी, पुढच्या काळात विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य, म्हणून जबाबदारी पार पाडलीच, याशिवाय काटेवाडी गावाच्या आरोग्य, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासात त्यांनी लक्षणीय योगदान दिलं. त्यांनी हाती घेतलेल्या ग्रामविकासाच्या कामातून काटेवाडी हे गाव निर्मलग्राम, यशवंतग्राम, तंटामुक्तग्राम, विमाग्राम, तसंच देशातलं पहिलं सायबरग्राम, कृषिग्राम आणि पर्यावरणग्राम झालं. ग्रामपंचायतीसह, प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीला आय.एस.ओ. मानांकन मिळालं. गावच्या दोन महिला सरपंचांचा आदर्श सरपंच पुरस्काराने गौरव झाला तर शिक्षकांचा राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शैक्षणिक विकासासाठी सुनेत्रा पवार यांनी ’शाळा प्रवेश उत्सव दिन’ उपक्रम सुरू केला, जो पुढे राज्यसरकारचा अधिकृत कार्यक्रम झाला. गाव उघड्यावर शौचापासून मुक्त करण्यासाठी त्यांनी राबवलेली भूमिका, संपूर्ण राज्यात ’गुड मॉर्निंग पथक’ या नावानं स्वीकारली गेली. पेयजलासाठी फिल्टर प्लँट बसवणारी आणि भूमिगत गटार योजना राबवणारी काटेवाडी पहिली ग्रामपंचायत ठरली.

२०१४ साली झीरो बॅलन्स अर्थात शून्य शिल्लक खाते उघडण्याची ‘जनधन योजना’ येण्याच्या सात वर्षांपूर्वीच सुनेत्रा पवार यांनी काटेवाडतल्या राष्ट्रीयीकृत बँकेशी सामंजस्य करार करून ’झीरो बॅलन्स’ची खाती उघडून दिली. भारतात प्रथमच काटेवाडी इथंच वाय मॅक्सच्या माध्यमातून महा ई -सेवा केंद्रांचा प्रारंभ झाला. राज्यसभेच्या खासदार म्हणूनही आपल्या सुमारे दीड वर्षाच्या कार्यकाळात सुनेत्रा पवार यांनी सदनात अनेक विषय मांडले, तालिका अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी समर्थपणे सांभाळली, तसंच संसदेच्या विविध समित्यांवरही मोलाचं योगदान दिलं. सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने काटेवाडी ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद करून घरांवर महिलांची मालकी निर्माण करण्यात आली. दारावर कुटुंबप्रमुख म्हणून महिलेच्या नावाची पाटी लावण्या सुरुवात झाली. काटेवाडीत असे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवून ग्रामविकासाचा मापदंड निर्माण करणाऱ्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपलं पदवीचं शिक्षण छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून पूर्ण केलं आहे.’’

**

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सहसचिव डॉ रश्मी बोरीकर यांनी, सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिमान व्यक्त करत, या पदावर कार्य करून सुनेत्रा पवार, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर छाप पाडतील असा विश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या…

बाईट डॉ. रश्मी बोरीकर

 

महाविद्यालयीन काळात सुनेत्रा पवार यांच्या वर्गमैत्रीण असलेल्या गीता खांबेकर यांनी, सुनेत्रा पवार यांच्याबद्दलच्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या…

बाईट गीता खांबेकर

**

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे काल दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक तसंच कर्मचारी वृंदाने अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.

नांदेडमध्ये अजित पवार यांना काल सर्व पक्षीयांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

****

नवीन फौजदारी कायदे, तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी प्रशिक्षित वकील आणि अभियोजक तयार करणं, आवश्यक असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने नवी मुंबईतल्या तळोजा इथं स्थापन करण्यात आलेल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वकील प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या इमारतीचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या संस्थेसाठी राज्य शासनाकडून १० कोटी रुपयांचं अनुदान आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वितरित केलं जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

****

देशामध्ये आणखी दोन नव्या पाणथळ जागांना ‘रामसर’ स्थळांचा दर्जा मिळाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशातल्या एटा जिल्ह्यातलं ‘पाटणा पक्षी अभयारण्य’ आणि गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात ‘छारी-धांड’ ही ठिकाणं रामसर क्षेत्रात समाविष्ट झाली आहेत. २०१४ मध्ये अशा पाणथळ जागा फक्त २६ होत्या, ही संख्या आता ९८ पर्यंत पोहोचल्याचं यादव यांनी सांगितलं आहे.

****

तिरुवअनंतपुरम इथं झालेल्या पाचव्या टी – ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ४६ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच भारताने पाच सामन्यांची मालिका चार – एक अशी जिंकली. कालच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात २७१ धावा केल्या. इशान किशनने १०३, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने ६३ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला न्यूझीलंडचा संघ २२५ धावांवर सर्वबाद झाला. अर्शदीप सिंगने पाच, तर अक्षर पटेलने तीन खेळाडू बाद केले. इशान किशन सामनावीर, तर सूर्यकुमार मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****

संत निवृत्तीनाथ महाराजांनी अध्यात्म हे फक्त ग्रंथांपुरतं मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष आचरणातून समाजासमोर ठेवलं, असं प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केलं आहे. ते काल नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथं संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी परिसरातल्या विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. केंद्र पुरस्कृत प्रसाद योजनेंतर्गत आवश्यक सुविधा देऊन त्या ठिकाणांचा शाश्वत विकास करण्यात येत असल्याचं शेखावत यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. हा १२ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम निवासी स्वरुपाचा आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने इच्छुक स्वयंसेवकांच्या तुकड्या १२ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यात कोलाड इथं पाठवण्यात येणार आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...