Sunday, 1 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.02.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 February 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ फेब्रुवारी २०२ सकाळी .०० वाजता

****

२०२६–२७ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर होण्यास सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीताराम सलग नवव्यांदा अर्थसंकल्पसादर करत आहेत. तत्पूर्वी सीतारामन यांच्यासह अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. अर्थसंकल्पात विकास, रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्थैर्य यावर भर देत आगामी आर्थिक वर्षातलं महसूल संकलन आणि खर्च याबाबतचा आराखडा सादर करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प तयार करण्याआधी सीतारामन यांनी तज्ज्ञांसह व्यापार संघटना, शिक्षण, आरोग्य, एमएसएमई, सेवा, भांडवली बाजार इत्यादी क्षेत्रांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली.

अर्थसंकल्पानिमित्त आज आकाशवाणीवर आपल्याला विविध चर्चात्मक कार्यक्रम आणि अर्थसंकल्पाचं विश्लेषण ऐकता येईल.

****

संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे. रविदास महाराज यांनी आपल्या विचारांनी आणि वाणीने समता, करुणा आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिला. जात, भेदभाव आणि असमानतेच्या पलीकडे जाऊन त्यांनी मानवतेला एकत्र बांधण्याचा मार्ग दाखवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संत गुरु रविदासजी यांच्या ६४९ व्या जयंतीनिमित्त पंजाबमधल्या जालंधरला भेट देणार आहेत. डेरा सचखंड बल्लान इथं आदरांजली वाहिल्यानंतर मोदी संत गुरु रविदासजी यांच्या सन्मानार्थ आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जालंधरजवळील आदमपूर विमानतळावर उतरल्यानंतर, या विमानतळाचं श्री गुरु रविदासजी विमानतळ, आदमपूर असं नवीन नाव असलेल्या नामफलकाचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर लुधियानामधल्या हलवारा विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं आभासी उद्घाटन ते करणार आहेत.

****

भारतीय तटरक्षक दल आज आपला ५० वा स्थापना दिवस साजरा करत आहे. आजच्याच दिवशी १९७७ मध्ये केवळ सात सागरी जहाजांसह भारतीय तटरक्षक दलाची स्थापना करण्यात आली होती. आज मात्र या दलाची १५५ जहाजं आणि ८० विमानांचा समावेश असलेल्या एका बलाढ्य सागरी शक्तीमध्ये उत्क्रांती झाली आहे. तटरक्षक दल २०३० पर्यंत २०० सागरी जहाजं आणि १०० विमानांचं आपलं लक्ष्यित सामर्थ्य गाठण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या सैनिकांना त्यांच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

****

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण तसंच अल्पसंख्याक विकास या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेल्या अर्थ आणि नियोजन विभागाचा कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सांभाळणार आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमांवर आपल्या भावना व्यक्त केल्या. शिव–शाहू–फुले–आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आणि दिवंगत अजित पवार यांची कर्तव्यनिष्ठा मनात ठेवून उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड काम करण्याची ग्वाही देत, विविध नेत्यांनी व्यक्त केलेल्या सदिच्छांबद्दल सुनेत्रा पवार यांनी कृतज्ञताही व्यक्त केली आहे.

****

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथल्या प्रशासकीय इमारतीचं आणि दर्शन रांग मंडपाचं उद्घाटन काल केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते झालं. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं सुरू असलेले प्रकल्प लवकर पूर्ण केले जातील असं सांगून या प्रकल्पांमुळे भाविकांना आणि पर्यटकांना उत्तम सुविधा मिळतील असा विश्वास शेखावत यांनी व्यक्त केला. समाजात समता, बंधुता आणि सदाचार यांचं बीज रोवण्याचं काम निवृत्तिनाथांनी केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. पर्यटन मंत्रालयानं प्रसाद योजनेअंतर्गत निवृत्ती महाराज आश्रम परिसरात ही इमारत बांधली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. हा १२ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम निवासी स्वरुपाचा आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने इच्छुक स्वयंसेवकांच्या तुकड्या १२ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यात कोलाड इथं पाठवण्यात येणार आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात १० फेब्रुवारी पर्यंत जमा करावे, असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त दोन फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर इथं पहिलं बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित हे संमेलन शहरातल्या द जैन इंटरनॅशनल स्कूल इथं होणार आहे.

****

भारतीय बॅडमिंटनपटू देविका सिहाग हिनं थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कालच्या उपांत्य सामन्यात देविकानं चायनीज तैपेईच्या हुआंग यू सुन हिचा २२-२०, २१-१३ अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला.

****

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतलं महिला एकेरीचं विजेतेपद एलेना रिबाकिना हिला मिळालं आहे. काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामान्यात तिनं आर्यना सबालेन्कावर सहा-चार, चार-सहा, सहा-चार अशा सेट्समध्ये विजय मिळवला. पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्कराझ यांच्यात होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...