Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 02
February 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ दुपारी १.०० वा.
****
लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या
चर्चेला सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हा ठराव मांडला, त्याला खासदार तेजस्वी सूर्या यांनी अनुमोदन दिलं.
****
देशातल्या शाळांमध्ये मुलींच्या एकूण नावनोंदणीचं प्रमाण
वाढल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत दिली.
ते प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. सरकार मुलींमध्ये शिक्षणाला चालना देण्यासाठी
आणि त्यांना सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे. २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने
देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहे स्थापन करण्याची घोषणा केली असल्याचं
त्यांनी सांगितलं.
दरम्यान, देशभरातल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांमध्ये सध्या सात
लाखांहून अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत असल्याची माहिती प्रधान यांनी अन्य एका उत्तरात
दिली. वंचित गटातल्या मुलींना निवासी शाळांच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देणं
आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं हे सुनिश्चित करणं, हे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये स्थापन करण्यामागील उद्देश
असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
अडुसष्टाव्या ग्रॅमी पुरस्कारांचं वितरण आज अमेरिकेत लॉस
एंजेलिस इथं झालं. तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांना ‘मेडिटेशन्स – द रिफ्लेक्शन्स
ऑफ हिज होलीनेस, द दलाई लामा’ या अल्बमसाठी ग्रॅमी
पुरस्काराने गौरवण्यात आलं. दलाई लामा यांच्या वतीनं संगीतकार रफस वेनराइट यांनी हा
पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारामुळे शांतता, करुणा, पर्यावरणाची काळजी आणि मानवजातीच्या एकतेचा संदेश अधिक व्यापकपणे
पोहोचेल, अशी प्रतिक्रिया दलाई लामा यांनी
दिली. हा सन्मान सामायिक वैश्विक जबाबदारीची दखल असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांनाही
‘म्यूझिक बाय जॉन विलियम्स’ या माहितीपटासाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.
****
यावर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प हा भारताला जागतिक स्पर्धेसह
नवोपक्रम आणि प्रगत उत्पादनाचं जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल
असल्याचं स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलु शेट्टी यांनी म्हटलं आहे.
काल लोकसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचं त्यांनी कौतुक केलं. हा अर्थसंकल्प
धोरणात्मक सातत्य, ग्रामीण आणि शहरी सुविधा, वारसा आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये उत्तम संतुलन साधण्याचा
प्रयत्न करतो, असं ते म्हणाले.
****
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज कराड इथल्या प्रितीसंगमावर
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करुन
त्यांना आदरांजली अर्पण केली. खासदार सुनील तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यावेळी उपस्थित होते. समाधीला
अभिवादन केल्यानंतर पवार या फलटण तालुक्यातल्या तरडगाव इथं विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची
भेट घेणार आहेत. विदीप जाधव यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला.
****
दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी, हा अर्थसंकल्प युवक-केंद्रित, शेतकरी-अनुकूल असा एक मजबूत रोडमॅप असल्याचं नमूद केलं. शहरी
विकास, नदी पुनरुज्जीवन, कृषी-व्यवसाय नेटवर्क आणि ग्रामीण संपर्क प्रकल्पांसाठी
मिळणाऱ्या निधीमुळे राज्यातल्या संतुलित विकासाला
बळकटी मिळेल, असंही त्या म्हणाल्या.
****
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही पक्षाचा पाया
रचणारी निवडणूक असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. कोल्हापूर
इथं प्रचारादरम्यान बोलताना त्यांनी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना अभिवादन
केलं. दु:ख असलं तरी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर प्रचाराला यावं लागतं. निवडणुका
या लढवय्या कार्यकर्त्यांच्या असतात, त्या पुढे ढकलता येत नाहीत, असं शिंदे यांनी सांगितलं. लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय
आपण थांबणार नाही, अशी ग्वाही देत ही लढाई
जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची असून अशा लढाईत नेहमी जनशक्तीचाच विजय होतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर
इथं आज पहिलं बालकुमार साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनातल्या कवी संमेलनात, महापालिकेच्या हर्सूल शाळेचा इयत्ता नववीतला विद्यार्थी
आर्यन राजपुरे आणि आठवीतली विद्यार्थिनी आयेशा फिरोज शेख यांच्या कवितांची निवड झाली
आहे.
****
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या
२२ वर्षांच्या कार्लोस अल्कराजने सर्बियाच्या दिग्गज नोवाक जोकोविचचा पराभव करत विजेतेपद
पटकावलं. या चुरशीच्या अंतिम सामन्यात अल्कराजने २-६, ६-२, ६-३, ७-५ अशा चार सेटमध्ये शानदार विजय मिळवला. सुरुवातीचा सेट गमावल्यानंतर
अल्कराजने दमदार पुनरागमन करत सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केलं. या विजयासह कार्लोस
अल्कराजच्या रुपात ऑस्ट्रेलियन ओपनला नवा विजेता मिळाला आहे.
****
No comments:
Post a Comment