Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 February 2026
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ फेब्रुवारी २०२६
सायंकाळी ६.१०
****
· संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर
चर्चेला प्रारंभ
· रेल्वेच्या अंदाजपत्रकात महाराष्ट्रासाठी २३ हजार ९२६ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद
· वाढत्या डिजिटल व्यसनासंदर्भात तज्ज्ञांचं कृतीदल नियुक्त करण्याचे निर्देश
· यंदाचे गोदावरी गौरव सन्मान सयाजी शिंदे तसंच प्रशांत दामले यांना जाहीर
आणि
· दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन
सज्ज
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील
धन्यवाद प्रस्तावावर चर्चेला प्रारंभ झाला. राज्यसभेत सदानंद मास्टर यांनी तर लोकसभेत
सर्वानंद सोनोवाल यांनी धन्यवाद प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला राज्यसभेत मेधा कुलकर्णी
यांनी तर लोकसभेत तेजस्वी सूर्या यांनी अनुमोदन दिलं. या प्रस्तावावर राज्यसभेत १६
तास तर लोकसभेत १८ तास चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा या चर्चेला उत्तर
देणार असल्याचं,
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं.
दरम्यान, लोकसभेत या प्रस्तावावरच्या
चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, निवृत्त
सैन्यदल प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातला काही मजकूर उधृत करण्याचा
प्रयत्न केला. मात्र कोणत्याही पुस्तक किंवा वृत्तपत्राच्या कात्रणावर सदनात चर्चा
होऊ शकत नसल्याचं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट करत, राहुल
गांधी यांना सदर मुद्दा मांडण्यास मनाई केली. या मुद्यावरून सदनाचं कामकाज वारंवार
बाधित झालं. चार वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही याच विषयावरून गदारोळ सुरू
झाल्यानं,
अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
आगामी आर्थिक वर्षासाठी रेल्वेच्या अंदाजपत्रकात महाराष्ट्रासाठी
२३ हजार ९२६ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केल्याची माहिती, रेल्वेमंत्री
अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुंबईत मध्य रेल्वे मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला
त्यांनी दूरदृष्य पद्धतीने संबोधित केलं. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून -
राज्यात
मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद या दोन द्रुतगती रेल्वे मार्गिकांना या
अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे
हा प्रवास ४८ मिनिटांत पूर्ण होईल, तर पुणे ते हैदराबाद प्रवास सुमारे दोन तासांत पूर्ण होईल, असं वैष्णव यांनी सांगितलं. अर्थसंकल्पात मान्यता मिळालेली नवी मालवाहतूक
मार्गिका राज्यातल्या वाढवण बंदरालाही जोडण्याची योजना असून यामुळे देशभरात
मालवाहतुकीचं जाळं तयार होईल, असं वैष्णव म्हणाले. राज्यात एकंदर एक लाख ७० हजार कोटी रुपयांचे रेल्वे
प्रकल्प सुरू असल्याची माहिती वैष्णव यांनी यावेळी दिली. मुंबई-अहमदाबाद बुलेट
ट्रेनचं काम वेगाने सुरू असून पुढच्या वर्षी ही ट्रेन सुरू होईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
****
केंद्र सरकार ‘माय भारत बजेट क्वेस्ट’, हा उपक्रम सुरू करणार आहे. युवा
व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. ‘माय
भारत’ प्लॅटफॉर्मवर उद्यापासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. येत्या १७ फेब्रुवारी पर्यंत
या स्पर्धेसाठी नोंदणी करता येईल. पहिल्या फेरीत ३० प्रश्नांची ऑनलाईन प्रश्नमंजुषा, आणि त्यानंतर निबंध फेरी असेल. या फेरीत निवड झालेल्या युवकांना मार्च महिन्यात
‘विकसित भारत’ अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद
साधण्यासाठी निमंत्रित केलं जाईल, अशी माहिती मांडवीय यांनी दिली.
****
मुलांमध्ये वाढत्या डिजिटल व्यसनाच्या दुष्परिणामांचा अभ्यास
करून उपाययोजना सुचवण्यासाठी तज्ज्ञांचं कृतीदल नियुक्त करण्याचे निर्देश राज्याचे
माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने २९
जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात तरुण तसंच अल्पवयीन मुलांमध्ये
सोशल मीडिया व्यसनाचे वाढते धोके नमूद केले आहेत. सोशल मीडिया वापरासाठी वयोमर्यादा
निश्चित करणं,
तसंच अल्पवयीन मुलांना उद्देशून असलेल्या डिजिटल जाहिरातींवर
निर्बंध आणण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने या
विषयाचं गांभीर्य लक्षात घेत, माहिती तंत्रज्ञान विभागाचे
प्रधान सचिव विरेंद्र सिंह यांना तज्ज्ञांचं कृतीदल नियुक्त करण्याचे निर्देश विधीज्ञ
शेलार यांनी दिले आहेत.
****
मुंबईत दादर इथे असलेलं सावरकर सदन १०० वर्षं जुनं नसल्यामुळे, ते संरक्षित स्मारक म्हणून घोषित करता येणार नाही, असा
खुलासा भारतीय पुरातत्व विभागाने केला आहे. अनेक महत्त्वाच्या बैठकींची साक्षीदार असलेली
ही वास्तु संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची याचिका, अभिनव
भारत काँग्रेस या सार्वजनिक संस्थेने दाखल केली होती. त्याविषयी प्रतिज्ञापत्र दाखल
करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुरातत्व विभागाला दिले होते. पुरातत्व विभागाने
आपली बाजू मांडताना, ही इमारत मुंबई महानगरपालिकेच्या वारसा यादीत
किंवा राज्याच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत समाविष्ट केली जाऊ शकते, असं सुचवलं आहे.
****
भारतीय वंशाचे हवामान शास्रज्ञ वीरभद्रन रामनाथ यांना रॉयल स्वीडीश
अकादमी ऑफ सायन्सेसनं २०२६ या वर्षाचा भूविज्ञान क्षेत्रातल्या योगदानासाठीचा क्रॉफर्ड
पुरस्कार जाहीर केला आहे. सुमारे ९ लाख डॉलर आणि सुवर्णपदक असं स्वरुप असलेला हा पुरस्कार, भूविज्ञानाच्या क्षेत्रातला नोबेल म्हणून ओळखला जातो. ८२ वर्षाचे असलेले रामनाथन
सध्या कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
****
नाशिक इथं कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव सन्मान आज जाहीर
करण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेते आणि सह्याद्री देवराईकार सयाजी
शिंदे,
नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रशांत दामले, विज्ञान क्षेत्रातील कामगिरी बद्दल डॉ.अनिरूध्द पंडित, चित्रकार
चंद्रमोहन कुलकर्णी, संगीत क्षेत्रासाठी उस्मान खान आणि साहस
प्रकारात आशिष माने यांची यंदा या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि २१ हजार रुपये, असं या पुरस्कारांचं स्वरूप
आहे. येत्या १० मार्चला कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले
जाणार आहेत.
****
बीड जिल्ह्यातील पृथ्वीराज भाऊसाहेब राणे या विद्यार्थ्याला
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इग्नाइटेड माईंड चिल्ड्रन क्रिएटिव्हिटी अॅण्ड इनोव्हेशन
नॅशनल अवॉर्ड जाहीर झालं आहे. बीड इथं राजस्थानी विद्यालयात दहाव्या इयत्तेत शिकत असलेला
पृथ्वीराज हा,
संपूर्ण महाराष्ट्रातून हा मान मिळवणारा एकमेव विद्यार्थी ठरला
आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं दहावी आणि बारावीच्या शालांत परीक्षा
कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. यासाठी परीक्षार्थी, पालक,
शिक्षकांसह समाजातील सर्व घटकांनी योगदान द्यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. शालांत परीक्षा पूर्व तयारीसाठी
झालेल्या दक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. कोणत्याही केंद्रावर कॉपी होणार नाही
याची दक्षता केंद्रप्रमुखांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी
दिले. गेल्यावर्षी गैरप्रकार झालेल्या ६ केंद्रांची मान्यता रद्द झाल्याकडे स्वामी
यांनी लक्ष वेधलं.
****
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांमध्ये
येत्या ७ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्व मतदारांना आपला
मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापनास आणि कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना या दिवशी भरपगारी सुटी किंवा सवलत
देणं बंधनकारक आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या महापौर निवडीसाठी येत्या
दहा तारखेला महापालिकेची विशेष महासभा होणार आहे. महापौर पदासाठीचे अर्ज परवा चार आणि
पाच फेब्रुवारीला खरेदी करता येणार असून, सहा फेब्रुवारीला सायंकाळी
६ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचं मनपा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
****
ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली
आणि उल्हासनगर या तिन्ही महापालिकेत महिला महापौर देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला
आहे. अहिल्यानगर, नागपूर, अमरावती, धुळे,
आणि मालेगाव महापालिकेत महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ
झाला आहे.
****
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज सातारा जिल्ह्यातल्या
कराड इथल्या प्रितीसंगमावर माजी मुख्यमंत्री तसंच माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण
यांच्या समाधी स्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार
यांनी दिवंगत अजित पवार यांच्यासह विमान अपघातात मृत झालेले पोलीस कर्मचारी विदीप जाधव
यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन, सांत्वन केलं.
****
पुण्यातील बहुचर्चित पोर्श कार अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं
आरोपी आदित्य अविनाश सूद याला नियमित जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील इतर आरोपींपैकी
आशिष मित्तल आणि अमर गायकवाड यांनाही न्यायालयानं जामीन मंजूर केला. हे आरोपी गेल्या
१८ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असल्यानं त्यांना जामीन देण्यात येत असल्याचं न्यायालयानं
नमूद केलं.
****
पुणे इथं अंडरवॉटर स्पोर्ट्स असोसिएशन इंडियाच्या वतीनं आयोजित
दुसरी राष्ट्रीय मास्टर चॅम्पियनशिप आणि तिसरी राष्ट्रीय इंडोर फ्री डायव्हिंग चॅम्पियनशिप
पार पडली. या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या एमजीएम विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक
डॉ. श्रीनिवास मोतीयेळे यांनी ५ पदकं जिकंली आहेत.
****
No comments:
Post a Comment