Tuesday, 3 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 03 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

भारत अमेरिका व्यापार करार म्हणजे जगातल्या दोन सर्वात मोठ्या लोकशाही अर्थव्यवस्थांना अधिक मजबूत करण्याच्या दिशेनं ऐतिहासिक पाऊल असल्याचं अखिल भारतीय व्यापारी महासंघानं म्हटलं आहे. हा करार, भारताला आत्मविश्वासपूर्ण, विश्वसनीय आणि महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय भागीदार बनवण्याच्या पंतप्रधानांच्या लक्ष्याला दर्शवतो, असं महासंघाचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटलं आहे. या करारामुळे देशातही सर्वसमावेशक विकास आणि समृद्धी सुनिश्चित झाली असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

**

केंद्रीय परिवहन आणि रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हा करार म्हणजे भारत अमेरिका द्विपक्षीय आर्थिक संबंधांतलं एक महत्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे. मेड इन इंडिया उत्पादनांवरचं शुल्क घटवून ते अठरा टक्के इतकं केल्यामुळे या दोन देशात विकास आणि सहकार्याचे नवे मार्ग खुले होतील, असं गडकरी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या करारामुळे दोन्ही देशांमध्ये रोजगारनिर्मिती, आर्थिक विकास आणि नवोन्मेषाला चालना मिळेल, तसेच ‘मेक इन इंडिया’ला बळ मिळेल, असं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा करार भारत-अमेरिका संबंधांसाठी ऐतिहासिक क्षण असल्याचं सांगत, सामरिक आणि आर्थिक भागीदारी अधिक मजबूत होईल, असं स्पष्ट केलं. गृहमंत्री अमित शहा यांनी १८ टक्क्यांपर्यंत शुल्क कपातीचा उल्लेख करत याला मोठा दिवस म्हटलं, तर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन मोठ्या लोकशाही देशांच्या नागरिकांना याचा फायदा होईल, असं सांगितलं. या कराराचं अमेरिका-भारत धोरणात्मक सहकार्य मंचानंही स्वागत केलं आहे.

****

नवी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अमेरिका, युरोपियन युनियन, न्यूझीलंड तसंच इतर अनेक देशांसोबत झालेल्या व्यापार करारांबद्दल रालोआ नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन केलं. या करारांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि जागतिक स्तरावर भारताची भूमिका अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या बैठकीदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा देखील सत्कार करण्यात आला.

****

देशात यंदाच्या रबी हंगामात पेरणी क्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाल्याचं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. गेल्या महिन्याच्या ३० तारखेपर्यंत देशभरात ६७६ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ही पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १५ लाख हेक्टरनं अधिक आहे. यंदा ३३५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर गहू, तर ४५ लाख हेक्टरवर भाताची पेरणी झाली आहे. डाळींच्या पेरणी क्षेत्रातही वाढ दिसून येत असून १३९ लाख हेक्टरवर डाळींची पेरणी करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार भरड धान्यांची पेरणी ६१ लाख हेक्टर, तर ९७ लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड झाली आहे.

****

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरच्या पालघर इथल्या दुस-या बोगद्याचं काम पूर्ण झाल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. डहाणू मधल्या जामशेत इथला हा चारशे चोपन्न मीटर लांब आणि चौदा पूर्णांक चार मीटर रुंद बोगदा या बुलेट ट्रेनच्या अप आणि डाऊन ट्रॅक्ससाठी जागा उपलब्ध करून देईल. पालघर जिल्ह्यात या रेल्वेमार्गाचा एका महिन्यातला हा दुसरा बोगदा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. एकूण पाचशे आठ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गाचं काम राज्यात वेगानं सुरू आहे.

****

हरित महाराष्ट्रासाठी ३०० कोटी वृक्षलागवडीचं व्यापक अभियान राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. प्रस्तावित हरित महाराष्ट्र प्राधिकरणाच्या माध्यमातून या मोहिमेचा समन्वय साधला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्षलागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या मोहिमेत स्टार्टअप्सचा सहभाग, रोपनिर्मितीसाठी खाजगी नर्सरी आणि बचत गटांना सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मराठवाड्यासारख्या कमी वृक्षाच्छादन असलेल्या भागात हा कार्यक्रम प्राधान्याने राबवला जाणार आहे.

****

बीड इथं यावर्षीच्या चंपावती महोत्सवाला सुरुवात झाली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाकरंडकाच्या पहिल्या चित्रकला स्पर्धेत बीड जिल्ह्यातल्या १८७ शाळांमधले बालकालाकार खूप मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...