Tuesday, 3 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.02.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 February 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ फेब्रुवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेला प्रारंभ

·      रेल्वेच्या अंदाजपत्रकात महाराष्ट्रासाठी २३ हजार ९२६ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद

·      युवकांसाठी केंद्रसरकारचा आजपासून 'माय भारत बजेट क्वेस्ट' उपक्रम

·      यंदाचे गोदावरी गौरव सन्मान सयाजी शिंदे तसंच प्रशांत दामले यांना जाहीर

आणि

·      दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेला प्रारंभ झाला. राज्यसभेत सदानंद मास्टर यांनी तर लोकसभेत सर्वानंद सोनोवाल यांनी धन्यवाद प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला राज्यसभेत मेधा कुलकर्णी यांनी तर लोकसभेत तेजस्वी सूर्या यांनी अनुमोदन दिलं. या प्रस्तावावर राज्यसभेत १६ तास तर लोकसभेत १८ तास चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या चर्चेला उत्तर देणार असल्याचं, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं.

दरम्यान, लोकसभेत या प्रस्तावावरच्या चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, निवृत्त सैन्यदल प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातला काही मजकूर उधृत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याही पुस्तक किंवा वृत्तपत्राच्या कात्रणावर सदनात चर्चा होऊ शकत नसल्याचं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट करत, राहुल गांधी यांना सदर मुद्दा मांडण्यास मनाई केली. या मुद्यावरून सदनाचं कामकाज वारंवार बाधित झालं. चार वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही याच विषयावरून गदारोळ सुरू झाल्यानं, अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.

****

आगामी आर्थिक वर्षासाठी रेल्वेच्या अंदाजपत्रकात महाराष्ट्रासाठी २३ हजार ९२६ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केल्याची माहिती, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुंबईत मध्य रेल्वे मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला त्यांनी दूरदृष्य पद्धतीने संबोधित केलं. ते म्हणाले…

बाईट- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

 

अर्थसंकल्पात मान्यता मिळालेली नवी मालवाहतूक मार्गिका राज्यातल्या वाढवण बंदरालाही जोडण्याची योजना असून, यामुळे देशभरात मालवाहतुकीचं जाळं तयार होईल, असं वैष्णव म्हणाले. राज्यात एकंदर एक लाख ७० हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगाने सुरू असून पुढच्या वर्षी ही ट्रेन सुरू होईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

****

भारतीय उत्पादनांवरील आयात करात अमेरिकेने कपात केली आहे. आता हा कर १८ टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या चर्चेनंतर पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमांवरून ही माहिती दिली.

****

केंद्र सरकार 'माय भारत बजेट क्वेस्ट', हा उपक्रम सुरू करणार आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. ‘माय भारत’ प्लॅटफॉर्मवर आजपासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. येत्या १७ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धेसाठी नोंदणी करता येईल. पहिल्या फेरीत ३० प्रश्नांची ऑनलाईन प्रश्नमंजुषा, आणि त्यानंतर निबंध फेरी असेल. या फेरीत निवड झालेल्या युवकांना मार्च महिन्यात ‘विकसित भारत’ अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी निमंत्रित केलं जाईल, अशी माहितीही मांडवीय यांनी दिली.

****

मुलांमध्ये वाढत्या डिजिटल व्यसनाच्या दुष्परिणामांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवण्यासाठी तज्ज्ञांचं कृतीदल नियुक्त करण्याचे निर्देश, राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिले. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने २९ जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात तरुण तसंच अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडिया व्यसनाचे वाढते धोके नमूद केले आहेत. सोशल मीडिया वापरासाठी वयोमर्यादा निश्चित करणं, तसंच अल्पवयीन मुलांना उद्देशून असलेल्या डिजिटल जाहिरातींवर निर्बंध आणण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने या विषयाचं गांभीर्य लक्षात घेत, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विरेंद्र सिंह यांना तज्ज्ञांचं कृतीदल नियुक्त करण्याचे निर्देश विधीज्ञ शेलार यांनी दिले.

****

मुंबईत दादर इथं असलेलं सावरकर सदन १०० वर्षं जुनं नसल्यामुळे, ते संरक्षित स्मारक म्हणून घोषित करता येणार नाही, असा खुलासा भारतीय पुरातत्व विभागाने केला आहे. अनेक महत्त्वाच्या बैठकींची साक्षीदार असलेली ही वास्तु संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची याचिका, अभिनव भारत काँग्रेस या सार्वजनिक संस्थेने दाखल केली होती. त्याविषयी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुरातत्व विभागाला दिले होते. पुरातत्व विभागाने आपली बाजू मांडताना, ही इमारत मुंबई महानगरपालिकेच्या वारसा यादीत किंवा राज्याच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत समाविष्ट केली जाऊ शकते, असं सुचवलं आहे.

****

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांचे  अस्थिकलश राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये नेले जात आहेत. काल छत्रपती संभाजीनगर इथं देवगिरी महाविद्यालयात पक्षाचे लोकप्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारी तसंच नागरिकांनी या अस्थिकलशाला पुष्पांजली अर्पण करून, अभिवादन केलं.  त्यानंतर कायगाव इथं गोदावरी नदीत अस्थी विसर्जित करण्यात आल्या. तर लातूर इथं हे अस्थिकलश आज आणले जाणार आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल सातारा जिल्ह्यातल्या कराड इथल्या प्रितीसंगमावर माजी मुख्यमंत्री तसंच माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्यासह विमान अपघातात मृत झालेले पोलीस कर्मचारी विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन, सांत्वन केलं.

****

नाशिक इथं कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव सन्मान काल जाहीर करण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेते आणि सह्याद्री देवराईकार सयाजी शिंदे, नाट्य क्षेत्रातल्या योगदानासाठी प्रशांत दामले, विज्ञान क्षेत्रातल्या कामगिरी बद्दल डॉ. अनिरूद्ध पंडित, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, संगीत क्षेत्रासाठी उस्मान खान आणि साहस प्रकारात आशिष माने यांची यंदा या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि २१ हजार रुपये, असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे. येत्या १० मार्चला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

****

यंदाचा राज्यस्तरीय पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार, ज्येष्ठ कीर्तनकार गोपाळ महाराज उरळकर यांना जाहीर झाला आहे. निवड समितीचे अध्यक्ष महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी काल ही घोषणा केली. मानपत्र, स्मृती चिन्ह आणि ५१ हजार रुपये अशा स्वरुपाचा हा पुरस्कार, येत्या सहा मार्चला अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं प्रदान करण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं दहावी आणि बारावीच्या शालांत परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. यासाठी परीक्षार्थी, पालक, शिक्षकांसह समाजातील सर्व घटकांनी योगदान द्यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. शालांत परीक्षा पूर्व तयारीसाठी काल झालेल्या दक्षता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. कोणत्याही केंद्रावर कॉपी होणार नाही याची दक्षता केंद्रप्रमुखांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. गेल्यावर्षी गैरप्रकार झालेल्या ६ केंद्रांची मान्यता रद्द झाल्याकडे स्वामी यांनी लक्ष वेधलं.

****

मुलं वाचती होण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज, बालसाहित्यिक डॉ. विशाल तायडे यांनी व्यक्त केली आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं बालसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. या संमेलनात ३०० विद्यार्थ्यांनी कथाकथन, नाट्यछटा, वाद–विवाद तसंच कवी संमेलनातून आपल्या साहित्यिक तसंच कलात्मक प्रतिभेचं सादरीकरण केलं.

****

बीड जिल्ह्यातील पृथ्वीराज भाऊसाहेब राणे या विद्यार्थ्याला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इग्नाइटेड माईंड चिल्ड्रन क्रिएटिव्हिटी अ‍ॅण्ड इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड जाहीर झाला आहे. बीड इथं राजस्थानी विद्यालयात दहाव्या इयत्तेत शिकत असलेला पृथ्वीराज हा, संपूर्ण महाराष्ट्रातून हा मान मिळवणारा एकमेव विद्यार्थी ठरला आहे.

****

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांमध्ये येत्या ७ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना आणि कारखान्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी किंवा सवलत देणं बंधनकारक आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या महापौर निवडीसाठी येत्या दहा तारखेला महापालिकेची विशेष महासभा होणार आहे. महापौर पदासाठीचे अर्ज उद्या चार आणि परवा पाच फेब्रुवारीला खरेदी करता येतील, सहा फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचं मनपा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

****

अंबाजोगाई इथले सहकारी संस्था कार्यालयाचे सहायक निबंधक संतोष भंडारी याना २५ हजार रुपये लाच घेताना काल रंगेहाथ पकडण्यात आलं. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या एका प्रकरणातला निर्णय संस्थेच्या बाजूने दिल्याबद्दल त्याने ५० हजार रुपयांची मागणी केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...