Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 February 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०३ फेब्रुवारी
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी – एनडीएच्या
संसदीय मंडळाची बैठक आज नवी दिल्लीत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, जे पी नड्डा, अश्विनी वैष्णव, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन
यांच्यासह लोक जनशक्ती पक्ष, एआयएडीएमके, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी एनडीए घटक पक्षांचे प्रतिनिधी
या बैठकीला उपस्थित होते. भारत – अमेरिका व्यापार करार झाल्याबद्दल यावेळी पंतप्रधान
मोदी यांचं अभिनंदन करण्यात आलं.
****
भारत आणि अमेरिकेच्या द्विपक्षीय
संबंधांमध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. भारतात उत्पादित झालेल्या अर्थात मेड
इन इंडिया उत्पादनांवरच्या आयात शुल्कात अमेरिकेनं घट केली आहे. हे आयात शुल्क आता
१८ टक्के होणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या
संदेशात दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर
पंतप्रधानांनी ही घोषणा केली. दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि दोन लोकशाही देश जेव्हा
एकत्रित काम करतात तेव्हा त्याचा फायदा सामान्य नागरिकांना होतो, असं त्यांनी म्हटलं आहे. द्विपक्षीय
भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी ट्रम्प यांच्यासमवेत काम करण्यास उत्सुक असल्याचंही
मोदी यांनी नमूद केलं.
भारत आणि अमेरिकेमधला हा ऐतिहासिक
व्यापार करार जागतिक व्यापारासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण असल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जगातल्या प्रमुख निर्यात करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये
भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्य टॅरिफ दर मिळणार आहे. यातून भारत-अमेरिका मैत्रीच्या
नव्या युगाची सुरुवात झाली असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
महाराष्ट्र कायम निर्यातीत अग्रेसर असलेलं राज्य आहे. त्यामुळे हा करार आपल्या राज्यातल्या
व्यवसायासाठी नवे क्षितिज खुले करेल, डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रांतिकारी
आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
राज्यातल्या महानगरपालिकांमध्ये महापौर
निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे.
ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या
तिन्ही महापालिकेत महिलांना महापौरपद देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. ठाण्यातून
शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड, कल्याण डोंबिवलीत हर्षाली
थविल चौधरी आणि उल्हासनगरमध्ये अश्विनी निकम यांची महापौरपदी नियुक्ती होणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर
पदासाठी भारतीय जनता पक्षाचे रवी लांडगे तर उपमहापौर पदासाठी शितल शिंदे यांची नावे
निश्चित करण्यात आली आहेत.
सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी
भाजपचे विनायक कोंड्याल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, उपमहापौरपदासाठी ज्ञानेश्वरी देवकर
यांचे नाव निश्चित करण्यात आलं आहे.
अहिल्यानगर महापालिकेत महापौरपदासाठी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गाडे, तर उपमहापौर पदासाठी
भाजपचे धनंजय जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव महापालिकेत
इस्लाम पक्षातर्फे महापौर पदासाठी शेख नसरीन खालीद हाजी यांनी, तर उपमहापौर पदासाठी समाजवादी पक्षातर्फे
शान-ए-हिंद यांनी अर्ज दाखल केला.
कोल्हापूरमध्ये महापौरदासाठी भाजपानं
रूपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा केली. नागपूरमध्ये भाजपाच्या नीता ठाकरे यांनी
महापौर पदासाठी तर लीला हाथीबेड यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून
महापौर पदासाठी स्नेहल ठाकरे तर उपमहापौर पदासाठी विवेक निकोसे यांनी अर्ज दाखल केले
आहेत.
चंद्रपूर महापालिका महापौर पदाची
प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून त्याआधी काँग्रेस महासचिव के. सी वेणुगोपाल यांच्याबरोबर
दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर तोडगा निघेल असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार
यांनी सांगितलं.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या
महापौर पदाची निवड येत्या दहा तारखेला होणार असून, उद्यापासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.
****
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या
पार्श्वभूमीवर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सहा इसमांना परभणी
तसंच जालना जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलं आहे. सेलूचे उपविभागीय
दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी ही कारवाई केली.
****
भारताची युवा स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं
अमेरिकेत झालेल्या प्रतिष्ठित स्क्वॉश ऑन फायर ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावत नवा इतिहास
घडवला आहे. अंतिम सामन्यात तिनं अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर
असलेल्या इंग्लंडच्या जिओर्जिना केनेडीचा १२–१०, ११–५, ११–७ अशा सरळ सेटमध्ये
पराभव केला. या विजयासह अवघ्या १७ वर्षे १० महिन्यांच्या वयात अनाहत सिंग जागतिक क्रमवारीत
पहिल्या २० खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारी
आशियातली सर्वात युवा महिला खेळाडू ठरली आहे. ती सध्या जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानावर
पोहोचली आहे. या ऐतिहासिक कामगिरीतून तिनं स्क्वॉश दिग्गज निकोल डेव्हिड आणि भारताची
दीपिका पल्लीकल यांचे विक्रमही मोडीत काढले आहेत.
****
No comments:
Post a Comment