Sunday, 1 February 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.02.2026 रोजीचे सायंकाळी 05.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 February 2026

Time 17.00 to 17.10

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ५.००

****

·      देशाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडणारा अर्थसंकल्प संसदेत सादर

·      शहरी आर्थिक क्षेत्रांचा नियोजनबद्ध विकास;महिला बचत गटांसाठी शी मार्ट्सची घोषणा

·      आयकर रचना जैसे थे मात्र करदात्यांना आयटीआर भरण्यासाठी मुदतवाढ

आणि

·      केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध तरतुदींचं उद्योग क्षेत्राकडून स्वागत

****

यंदाचा अर्थसंकल्प गरीब, वंचित आणि देशाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडणारा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतांना सीतारामन यांनी, या अर्थसंकल्पाच्या तीन कर्तव्यांकडे लक्ष वेधलं. देशाचा आर्थिक विकास गतीमान आणि चिरस्थायी करणं, जनतेला अधिक सक्षम करून समृद्धीच्या वाटेवर भागीदार करून घेणं, आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचवणं, हेच या अर्थसंकल्पाची तीन कर्तव्य असल्याचं, सीतारामन यांनी सांगितलं. या अर्थसंकल्पाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून -

या अर्थसंकल्पात औद्योगिक क्षेत्रात वाढ आणि आत्मनिर्भरतेवर भर देतानांच, सेमीकंडक्टर सप्लाय चेन मजबूत करणं, ग्राम स्वराज योजनेतून ग्रामीण उद्योगांना चालना इणं, तसंच बायोफार्मा संशोधन, वस्त्रोद्योग, क्रीडासाहित्य, कंटेनर उत्पादन आणि हातमाग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.

 

आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसंच विकास दरात वाढ करण्यासाठी सहा क्षेत्रांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न सरकारने या अर्थसंकल्पातून केला आहे. परदेशातल्या भारतीयांसाठी शेअर बाजारातल्या गुंतवणूक मर्यादेत वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. मधुमेह तसंच कर्करोग यासारख्या दुर्धर आजारांची औषधं कमी दरात उपलब्ध करुन दिली जाणार असून, भारताला जागतिक बायो-फार्मा उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी ‘बायो फार्मा शक्ती’ ही योजना प्रस्तावित आहे. याअंतर्गत पुढील पाच वर्षांत दहा हजार कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. या माध्यमातून बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलर्सच्या देशांतर्गत उत्पादनासाठी सक्षम परिसंस्था उभी करण्यात येणार आहे. देशभरात पाच ठिकाणी मेडिकल हब विकसित केले जाणार आहेत. पशू चिकित्सा चालना देण्यासाठी जामनगर मध्ये WHO वैश्विक पारंपारिक चिकित्सा योजना राबवली जाईल, देशात आयुर्वेदाचं शिक्षण देणाऱ्या तीन नव्या संस्था उभारल्या जाणार असून, पशुवैद्यक महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी भरीव अर्थसहाय्य दिलं जाणार आहे.

 

लखपती दीदींच्या धर्तीवर महिला बचत गटांसाठी शी मार्ट्स सुरू करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात आहे. खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राला बळकटी देण्यासाठी, त्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी आणि ब्रँडिंगसाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम राबवण्याचा प्रस्ताव यंदाच्या अर्थसंकल्पात आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये कॉर्पोरेट मित्र ही व्यवस्था उभारण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. कॉर्पोरेट मित्र या व्यवस्थेअंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना नियमांचे पालन करण्याची प्रक्रिया परवडणाऱ्या दरात पूर्ण करण्यासाठी मदत पुरवली जाईल असं त्या म्हणाल्या. मच्छिमारीला प्रोत्साहन देण्यासाठी ५०० सरोवरांचा विकास केला जाणार आहे.

 

या अर्थसंकल्पातून द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार असून, या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी १२ कोटी दोन लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. येत्या पाच वर्षात शहरी आर्थिक क्षेत्रावर पाच हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे. 

 

२०० वारसा औद्योगिक क्लस्टर्सच्या पुनरुज्जीवनासाठी या अर्थसंकल्पात विशेष योजना प्रस्तावित करण्यात आली असून, उद्योगांच्या प्रोत्साहनासाठी १० हजार कोटी रुपयांचा एसएमई विकास निधी प्रस्तावित असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

 

परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी गुंतवणूकदारांसाठी विविध कर सवलती या अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आल्या आहेत.

 

बांधकाम आणि पायाभूत सुविधा उपकरणांच्या उन्नतीसाठी नवीन योजना आणणं प्रस्तावित असून, कंटेनर उत्पादनासाठी पुढील वर्षांत १० हजार कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे.

 

पुढच्या पाच वर्षांत २० नवे राष्ट्रीय जलमार्ग होणार सुरु वाराणसी तसंच पाटणा इथं, जहाज दुरुस्ती सुविधा सुरू केली जाणार आहे.

 

देशभरातल्या २० प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर दहा हजार गाइड्सची नियुक्ती केली जाईल. या गाइड्सच्या कौशल्य वाढीवर सरकार विशेष भर देईल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

परदेश प्रवासाच्या पॅकेजवरच्या टीडीएसमध्ये कपात करून तो दोन टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे.

 

अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, मणीपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये बौद्ध सर्कीट विकास करण्यासाठी विशेष योजना या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. यामध्ये मंदिरं तसंच मठांचं संवर्धन, भाषा अनुवाद केंद्र तसंच यात्रेकरूंसाठीच्या सुविधांचा समावेश असणार आहे.

****

या वर्षात सरकारला साडे छत्तीस लाख कोटी रुपये एकूण महसूल प्राप्त होण्याचा अंदाज असून, त्यातले २८ लाख ७० हजार कोटी रुपये करवसुलीतून मिळतील. येत्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट ४ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील असा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षासाठीचा करसंकलनाचा सुधारित अंदाज ३४ लाख कोटी तर खर्चाचा सुधारित अंदाज ४९ लाख ६० हजार कोटी रुपये असेल, अर्थसंकल्पात म्हटलं आहे.

 

सर्वसामान्य करदात्यांचं विशेष लक्ष असलेल्या आयकर संरचनेत या अर्थसंकल्पात कोणताही बदल प्रस्तावित करण्यात आलेला नाही, मात्र, कर विवरणपत्रात दुरुस्ती तसंच कर विवरण पत्र भरण्याची विलंबित मुदत वाढवण्यात आली आहे. याबाबत सनदी लेखापाल उमेश शर्मा यांनी माहिती दिली. ते म्हणाले -

बाईट – उमेश शर्मा

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत

****

हा अर्थसंकल्प २०४७ च्या विकसित भारताच्या गरुडझेपेचा हा एक सशक्त आधार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सुधारणांच्या प्रक्रियेला उर्जा आणि गती देणारा हा युवा अर्थसंकल्प असल्याचं नमूद करतांना पंतप्रधान म्हणाले.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत करतांनाच, जिल्हा सामान्य रुग्णालयं अधिक उन्नत करून जास्तीत जास्त अतिदक्षता विभाग उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचं नमूद केलं.

काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी घोर निराशादायी असल्याची टीका केली, तर या अर्थसंकल्पात रोजगारनिर्मितीसाठी ठोस उपाययोजना नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे

****

छत्रपती संभाजीनगर इथले सीआयआय आणि सीएमआयएचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत करत, अर्थसंकल्पामुळे थेट परकीय गुंतवणूक वाढण्यात मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले -

बाईट – मुकुंद कुलकर्णी

****

बांधकाम व्यावसायिक विवेक देशपांडे यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना, मराठवाड्यात रोजगाराच्या संधी वाढणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले -

बाईट – विवेक देशपांडे

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 24 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...