Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 March
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ मार्च २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
पश्चिम आशियातल्या भारतीयांच्या
मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून नियंत्रण कक्ष स्थापन
·
महाराष्ट्रातल्या रहिवाशांना
सुरक्षित मायदेशी आणणार - मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
·
कर्जवसुलीत रिझर्व बँकेच्या
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संस्था किंवा सावकारांवर राज्य सरकार करणार कारवाई
·
राज्यसभेसाठी भाजपकडून चार उमेदवार
जाहीर, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचं नाव निश्चित
आणि
·
टी-ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारत – इंग्लंड सामना; न्यूझीलंड अंतिम फेरीत
दाखल
****
पश्चिम आशियातल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने
नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. पश्चिम आशियात जवळपास एक कोटी भारतीय नागरिक राहतात
आणि त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे. अमेरिका-इराण
संघर्षादरम्यान इराणमधल्या भारतीय दूतावासाने तेहरानमधून शेकडो भारतीय विद्यार्थ्यांना
सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. आखातातला संघर्ष थांबवण्यासाठी वाटाघाटीचा मार्ग स्वीकारावा
असं आवाहन भारतानं पुन्हा केलं आहे.
****
या संघर्षग्रस्त भागात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या लोकांना सुखरूप
आणि सुरक्षित मायदेशी आणलं जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त
केलं आहे. ते काल विधान परिषदेत बोलत होते. राज्य सरकार विविध पद्धतीनं सर्व प्रकारची
मदत करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले…
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
रिझर्व्ह बँकेनं निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारणाऱ्या
तसंच कर्जवसुलीसाठी बळाचा वापर करणाऱ्या परवानाधारक सावकारांवर कठोर कारवाईचा इशारा
मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. काल विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. अशा सावकारांचा परवाना
नियमानुसार रद्द केला जाईल,
असा इशारा ही मुख्यमंत्र्यांनी
दिला. ते म्हणाले…
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
हरवलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या
विशेष पथकामुळे,
गेल्या वर्षभरात महिलांचा शोध लागण्याच्या प्रकरणांची संख्या, १०
टक्क्यांनी वाढल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, २० जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान ऑपरेशन
मुस्कान राबवण्यात आलं,
४५४ मुलं आणि ९४७ मुली अशी एक हजार ४०१ बालकं शोधण्यात आल्याची
माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
****
२०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प, उद्या
सहा मार्च रोजी मुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत
सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सर्वसामान्यांना समजावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं
आणि २०२० मध्ये आजच्याच दिवशी नागपूर इथं प्रकाशित झालेलं, “अर्थसंकल्प सोप्या भाषेत” हे पुस्तक, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट
देवेंद्र फडणवीस डॉट इन स्लॅश बजेट अंडरस्कोर ट्वेंटी ट्वेंटी, या
संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
****
राज्यातले २७१ एसटी डेपो सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर विकसित
करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत चांगल्या उत्पन्नक्षम डेपोसोबत दोन ग्रामीण
किंवा तालुका स्तरावरील डेपो अशा तीन डेपोचं एक पॅकेज तयार करण्यात येणार आहे. परिवहन
मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली.
राज्यातल्या बसस्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्याचा
निर्णय घेण्यात आला असून,
शिवनेरी बस सेवेचाही राज्यभर विस्तार करण्यात येणार असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या ई-पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत नेटवर्क किंवा सर्व्हरच्या
अडचणीमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून ऑफलाइन फोटो नोंदणीची सुविधा
उपलब्ध करण्यात आली आहे. मोबाईल नेटवर्क नसताना शेतकऱ्यांनी आपल्या शेतातल्या पिकाचा
फोटो काढून ठेवला,
तर नेटवर्क उपलब्ध झाल्यावर तो
आपोआप प्रणालीवर अपलोड होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी दिली.
****
राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज
संपत आहे. भारतीय जनता पक्षाने राज्यातल्या चार जागांसाठी काल उमेदवार जाहीर केले.
यामध्ये रामदास आठवले,
विनोद तावडे, माया ईवनाते आणि रामराव वडकुते
यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीने काल आपल्या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार
यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार
सुप्रिया सुळे यांनी काल मुंबईत माध्यमांना ही माहिती दिली.
****
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबतची बैठक काल उपमुख्यमंत्री
तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यंदाची छत्रपती शिवाजी
महाराज चषक व्हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ इथं, कबड्डी स्पर्धा नागपूर इथं, स्वर्गीय
खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा बीड इथं तर भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धा बारामती
इथं घेतली जाणार आहे. या स्पर्धांमुळे राज्याची समृद्ध क्रीडा परंपरा अधिक बळकट होऊन
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री
पवार यांनी व्यक्त केला.
****
टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज उपान्त्य फेरीचा
दुसरा सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान होणार आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर संध्याकाळी
सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
दरम्यान, काल झालेल्या पहिल्या उपान्त्य सामन्यात
दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन न्यूझीलंडने अंतिम फेरीत धडक मारली.
****
श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर तीर्थक्षेत्राचा विकास पुढील
शंभर वर्षांचा विचार करून व्हावा, अशा स्पष्ट सूचना धाराशिवचे पालकमंत्री प्रताप
सरनाईक यांनी दिल्या आहेत. ते काल याबाबतच्या बैठकीत बोलत होते. देशातील नामांकित विकासक
आणि तज्ज्ञ संस्थांचा सहभाग घेऊन या प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याचे
निर्देशही सरनाईक यांनी यावेळी दिले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची
माहिती, जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. आखाती देशांत तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवडा
निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं
आवाहन प्रशासन तसंच इंधन पुरवठादार संघटनेकडून करण्यात आलं आहे.
बीड जिल्ह्यातही कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नसून, नागरिकांनी
अफवांवर विश्वास ठेवू नये,
असं आवाहन जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी
केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं बौद्ध लेणी परिसरात गौण खनिजाचं उत्खनन
करून तस्करी केली जात असल्याचा मुद्दा, काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय
वडेट्टीवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे काल विधानसभेत मांडला. हे उत्खनन थांबववण्यासाठी
कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या दाती इथले ज्येष्ठ
स्वातंत्र्य सेनानी मारोतराव लक्ष्मणराव सूर्यवंशी मानकरी यांचं काल वृद्धापकाळानं
निधन झालं,
ते ९९ वर्षांचे होते. काल दाती इथं त्यांच्या पार्थिव देहावर
अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने त्यांना सलामी देण्यात
आली.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समितीसाठी १६ सदस्यांच्या
निवडीसाठी आज विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत गटनेत्यांना स्थायी समितीसाठी
सदस्यांची नावं कळवावी लागणार आहेत.
जालना महानगरपालिकेत सहा स्वीकृत सदस्यांची नावं प्राप्त झाली
होती, यापैकी चार सदस्य पात्र तर दोन सदस्य अपात्र ठरले आहेत
****
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात एक मालवाहू वाहन नदीपात्रात
कोसळून एकाचा मृत्यू झाला. येलदरी धरणाजवळील अत्यंत अरुंद आणि धोकादायक पुलावरून मंगळवारी
रात्री हे वाहन कोसळलं. अंकुश रामेश्वर शिंदे असं या अपघातात दगावलेल्या युवकाचं नाव
आहे.
****
तुळजापूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक आरदवाड यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाच६चपन प्रनिबंधक पथकाने रंगेहात पकडले आहे.एका दाखल झालेल्या गुन्ह्यात कलम न वाढवण्याच्या कारणावरून त्यांनी ही लाच मागितली होती.
No comments:
Post a Comment