Wednesday, 4 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      पश्चिम आशियातल्या भारतीयांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून नियंत्रण कक्ष स्थापन

·      महाराष्ट्रातल्या रहिवाशांना सुरक्षित मायदेशी आणणार - मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

·      राज्यसभेसाठी भाजपकडून चार उमेदवार जाहीर - विनोद तावडे, रामदास आठवले तसंच रामराव वडकुते यांचा समावेश

·      सोलापूर विद्यापीठाचा पहिला अहिल्यारत्न पुरस्कारडॉ. मंदाकिनी आमटे यांना जाहीर

आणि

·      यंदाच्या खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं बीड इथं आयोजन

****

पश्चिम आशियातल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. पश्चिम आशियात जवळपास १ कोटी भारतीय नागरिक राहतात आणि त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे. अमेरिका-इराण संघर्षादरम्यान इराणमधल्या भारतीय दूतावासाने तेहरानमधून शेकडो भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. आखातातला संघर्ष थांबवण्यासाठी वाटाघाटीचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन भारतानं पुन्हा केलं आहे.

****

या संघर्षग्रस्त भागात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना सुखरूप आणि सुरक्षित मायदेशी आणलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केलं आहे. ते आज विधान परिषदेत बोलत होते. राज्य सरकार विविध पद्धतीनं सर्व प्रकारची मदत करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

रिझर्व्ह बँकेनं निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारणाऱ्या तसंच कर्जवसुलीसाठी बळाचा वापर करणाऱ्या परवानाधारक सावकारांवर कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. अशा सावकारांचा परवाना नियमानुसार रद्द केला जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. ते म्हणाले-

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

२०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प, परवा ६ मार्च रोजी मुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सर्व सामान्यांना समजावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं आणि २०२० मध्ये आजच्याच दिवशी नागपूर इथे प्रकाशित झालेलं “अर्थसंकल्प सोप्या भाषेत” हे पुस्तक डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट देवेंद्र फडणवीस डॉट इन स्लॅश बजेट अंडरस्कोर ट्वेंटी ट्वेंटी या संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. या पुस्तकात ‘बजेट’ शब्दाच्या उत्पत्तीपासून ते अर्थसंकल्प समजून घेण्यापूर्वी कोणत्या बाजू समजून घ्याव्यात याबद्दलची विस्तृत माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

****

राज्यातील २७१ परिवहन डेपो सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत चांगल्या उत्पन्नक्षम डेपोसोबत दोन ग्रामीण किंवा तालुका स्तरावरील डेपो अशा तीन डेपोचे एक पॅकेज तयार करण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न तर सदस्य सदाभाऊ खोत, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे विनामूल्य आणि स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन महिन्यांत या योजनेची अंमलबजावणी होणार असून प्रवाशांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही अशी माहितीही मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिली.

****

बांबु लागवड आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अटल बांबु समृद्धी योजना राबवत असून यासाठी हेक्टरी सात लाख रुपये अनुदान दिलं जात असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भातल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. बांबुपासून विविध वस्तू तयार करणं हा बुरूड समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायाला फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल, तसंच त्यांना बांबू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासनही नाईक यांनी यावेळी दिलं.

राज्यातील ई-पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत नेटवर्क किंवा सर्व्हरच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून ऑफलाइन फोटो नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नेटवर्क नसताना आपल्या शेतातील पिकाचा फोटो काढून ठेवला तर नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर तो आपोआप प्रणालीवर अपलोड होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.

****

राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने राज्यातल्या चार जागांसाठी आज उमेदवार जाहीर केले. यामध्ये रामदास आठवले, विनोद तावडे, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे.

दरम्यान, या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आज चर्चेनंतर जाहीर होतील, अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी आणि विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळावी, अशी आपली मागणी असून, अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार असल्याचं ते म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उमेदवारी देण्यासंदर्भात महाविकास आघाडी निर्णय घेईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. यासंदर्भात आपण घटकपक्षांशी चर्चा केली असून, आज नावं निश्चित होतील, असं पाटील यांनी सांगितलं.

****

सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा पहिला ‘अहिल्यारत्न पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांना जाहीर झाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. डॉ. मंदाकिनी आमटे यांनी दुर्गम आणि आदिवासी भागात आरोग्य, शिक्षण तसंच मानवसेवेच्या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ५१ हजार रुपये असं या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. अहिल्यारत्न पुरस्काराचं हे पहिलंच वर्ष आहे.

****

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबतची बैठक आज उपमुख्यमंत्री तथा क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यंदाची छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ इथं, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नागपूर इथं, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बीड इथं तर भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा बारामती इथं घेतली जाणार आहे. या स्पर्धांमुळे राज्याची समृद्ध क्रीडा परंपरा अधिक बळकट होऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.

****

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतला पहिला उपान्त्य सामना आज कोलकात्यात ईडन गार्डन्स मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडदरम्यान रंगणार आहे. सामना संध्याकाळी सात वाजता सुरु होईल. उपान्त्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताची लढत उद्या इंग्लंडशी होणार आहे. हा सामना मुंबईत वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे.

****

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात दोन्ही योजना मिळून ३४ लाख ३१ हजार लोकांपर्यंत कार्ड पोहोचवण्याचं उद्दीष्ट असून आतापर्यंत १० लाख ८७ हजार जणांना कार्ड प्रदान करण्यात आले आहेत. हे कार्ड देण्यासाठी आशा स्वयंसेविका, आपले सेवा केंद्र आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे नोंदणी सुविधा आणि लॉग इन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली. आखाती देशांत तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रशासन तसंच इंधन पुरवठादार संघटनेकडून करण्यात आलं आहे.

बीड जिल्ह्यातही कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नसून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...