Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 04
March 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ मार्च २०२६ दुपारी १.०० वा.
****
राज्य आणि राष्ट्रीय रस्त्याप्रमाणे राज्यातल्या सर्व
पाणंद रस्त्यांना क्रमांक दिला जात असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
आज विधानसभेत सांगितलं. आतापर्यंत ९७ हजार ५६४ रस्त्यांना असा क्रमांक दिल्याची माहिती
त्यांनी दिली. पाणंद रस्त्यांच्या सीमा आखून त्याची नोंद सातबाऱ्यावर घ्यायचा निर्णय
सरकारने घेतला असून, याची जबाबदारी ग्राम
महसूल अधिकाऱ्याकडे सोपवली असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री बळीराजा
शेत पाणंद रस्त्याची माहिती देणारं संकेतस्थळ ३१ मार्चच्या आधी तयार केलं जाणार असल्याचंही
ते म्हणाले.
ई–पिक पाहणी दरम्यान शेतकऱ्यांना फोटो अपलोड करण्यात काही अडचणी येत असून, त्या लवकरच दूर केल्या जातील, असं बावनकुळे यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.
****
विदर्भातल्या अनेक कारखान्यांमध्ये स्फोट होऊन कामगारांचा
मृत्यू झाल्याप्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव
मांडला. गेल्या दीड वर्षात पाच ते सहा
कारखान्यांमध्ये झालेल्या स्फोटात जवळपास ४३ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी
दिली. यासंदर्भात सदनात चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. या माहितीचं गांभीर्य लक्षात
घेता, सदनात चर्चा केली जाईल, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
****
राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने
राज्यातल्या चार जागांसाठी आज उमेदवार जाहीर केले. यामध्ये रामदास आठवले, विनोद तावडे, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे.
दरम्यान, या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आज चर्चेनंतर जाहीर होतील, अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते आज
मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा
काँग्रेसला मिळावी आणि विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळावी, अशी आपली मागणी असून, अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार असल्याचं ते म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उमेदवारी
देण्यासंदर्भात महाविकास आघाडी निर्णय घेईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील
यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. यासंदर्भात आपण घटकपक्षांशी
चर्चा केली असून, आज नावं निश्चित होतील, असं पाटील यांनी सांगितलं.
****
मुंबई–पुणे महामार्गावर धावणारी अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित ‘शिवनेरी’ बस आता राज्यातल्या प्रमुख
शहरांदरम्यान चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी
महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. २००२ पासून सुरु झालेली आणि सुरुवातीपासूनच
नफ्यात असलेली शिवनेरी बस सेवा राज्यभरात सुरु करण्यासाठी २०० अत्याधुनिक व्होल्व्हो
बसच्या खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू असून यात ३० स्लीपर बसेसचा समावेश असल्याचं
त्यांनी सांगितलं. महिला प्रवाशांना तसंच ६५ ते ७५ वयोगटातल्या ज्येष्ठ नागरिकांना
शिवनेरीच्या तिकीटदरात ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना शिवनेरी प्रवास पूर्णपणे विनामूल्य
आहे. त्यामुळे नव्या मार्गांवरही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.
****
पुण्यातील देहूगाव इथं होणाऱ्या तुकाराम बीजसाठी राज्याच्या
कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो भाविकांसाठी पुणे महानरपालिका परिवहन सव्वाशे जादा बसगाड्या
सोडणार आहे. आजपासून परवा सहा मार्च दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महत्वाच्या
स्थानकांवरून या गाड्या सोडण्यात येतील.
****
होळी निमित्ताने केला जाणाऱ्या गेर डिंडन नृत्याचा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा
तालुक्यात सोजदान इथं पार पडला. यासाठी डिंडन नृत्य करणारे आदिवासी बांधव हे कठोर व्रत
धारण करुन पांरपारीक वेशभुषा धारण करतात. कडाक्याच्या उन्हात पारंपारीक वेशभूषेत अनवाणी
पायांनी केलं जाणारं हे नृत्य आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं. हजारो नागरिक हे नृत्य पाहण्यासाठी
उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं येत्या १० मार्च रोजी विभागीय स्तरावरील
लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हास्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमात ज्या
प्रश्नांची सोडवणूक होवू शकली नाही किंवा किंवा प्रश्नाबाबत तक्रारदाराचं समाधान झालेलं
नाही, असे सर्व प्रश्न विभागीय स्तरावरील
लोकशाही दिनामध्ये घेण्यात येणार असल्याचं विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे
कळवलं आहे.
****
टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पहिल्या उपांत्य
सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघात लढत होणार आहे. कोलकाता इथं संध्याकाळी
सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. उपान्त्य फेरीचा दुसरा सामना उद्या भारत आणि
इंग्लंड दरम्यान होईल.
****
No comments:
Post a Comment