Wednesday, 4 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.03.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 04 March 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ मार्च २०२ सकाळी.०० वाजता

****

फिनलँडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं. केंद्रीय राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंह यांनी त्यांचं विमानतळावर औपचारिक स्वागत केलं, यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. राष्ट्रपती स्टब २०२६ च्या रायसिना संवादात प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.  

****

अमेरिका आणि इराणमधला संघर्ष थाबंवण्यासाठी राजनैतिक उपाय योजण्याचे तसंच संवाद साधण्याचं आवाहन भारताने पुन्हा केलं आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपवण्याच्या बाजुने भारत आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे. जवळपास एक कोटी भारतीय आखाती देशात काम करतात, त्यांची सुरक्षितता भारतासाठी महत्वाची आहे, ज्या गोष्टीचा भारतावर थेट परिणाम होतो, त्यापासून भारत अलिप्त राहू शकत नाही, असं या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, भारताचे लोक जगभरात कामासाठी विखुरले आहेत, त्यामुळे भारत जहाजांवरच्या हल्ल्यांनाही ठामपणे विरोध करतो, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पज्ञवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं.

****

दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर अबू धाबीतील भारतीय दुतावास आणि दुबईतील काउन्स्युलेट जनरल ऑफ इंडिया, भारतीय नागरिकांशी सतत संपर्कात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भारतीय नागरिकांनी घाबरू नये, केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि संपूर्ण सहाय्य करतील, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे.

****

तटरक्षक दलासाठी अद्ययावत हेलिकॉप्टर्स आणि नौदलासाठी अद्ययावत श्तिल क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने एकूण पाच हजार ८३ कोटी रुपयांचे करार केले आहेत. नवी दिल्ली इथं संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत काल त्यावर स्वाक्षऱ्या झाल्या. या अंतर्गत कमी वजनाची सहा डबल इंजिन हेलिकॉप्टर्स आणि त्यासाठीची इतर सामुग्री बंगळुरूच्या हिंदुस्तान एअरोनॉटिक्सकडून दोन हजार ९०१ कोटी रुपयांना खरेदी करण्यात येणार आहे. पृष्ठभागावरुन हवेत मारा करणाऱ्या श्तिल क्षेपणास्त्रांची खरेदी जेएससी रोसोबोरॉन एक्सपोर्ट्स या रशियन कंपनीकडून दोन हजार १८२ कोटी रुपयांना खरेदी करण्यात येणार आहे. या संरक्षण सामुग्रीमुळे दोन्ही दलांच्या युद्धकालीन आणि आपत्कालीन परिचालन क्षमतेत वाढ होणार आहे.

****

राज्यसभेच्या सहा राज्यातल्या जागांसाठी भारतीय जनता पक्षाने नऊ उमेदवारांची नावं जाहीर केली. नवनियुक्त पक्षाध्यक्ष नितिन नबीन यांना बिहार मधून उमेदवारी देण्यात आली आहे. हरियाणातले माजी लोकसभा सदस्य संजय भाटीया तसंच ओदिशातले राज्यसभेचे सदस्य सुजीतकुमार आणि माजी सदस्य मनमोहन सामल हे वगळता सर्व नवे चेहरे आहेत. राज्यसभेच्या ३७ सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिलमध्ये संपत असल्याने १६ मार्चला ही निवडणूक होणार आहे. राज्यातल्या सात सदस्यांचा त्यात समावेश असून, अद्याप कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

****

गेल्या सहा महिन्यांत एक लाखाहून अधिक शाळांमधल्या एक कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी अनिवार्य बायोमेट्रिक नोंदणी पूर्ण केली आहे, असं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या मोहिमेअंतर्गत शाळांमध्ये आयोजित शिबिरांव्यतिरिक्त, विद्यार्थी कोणत्याही आधार सेवा केंद्रांमध्ये त्यांची बायोमेट्रिक नोंदणी पूर्ण करू शकतात, असंही या निवेदनात म्हटलं आहे. विविध सरकारी योजना, शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रमाणीकरण करताना, तसंच नीट, जेईई इत्यादी स्पर्धात्मक आणि विद्यापीठ परीक्षांमध्ये या बायोमेट्रिक नोंदणीचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

****

आगामी महिला दिनाचं औचित्य साधून लातूर इथं राजर्षी शाहू महाविद्यालय आणि अस्तित्व सेवाभावी बहुउद्देशीय प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'लातूर वुमेन्स प्रीमियर लीग क्रिकेट' स्पर्धा घेण्यात आली. विविध क्षेत्रातल्या महिलांनी यात सहभाग घेतला. या स्पर्धेत एकूण १० संघांचा सहभाग होता.

****

ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेला कालपासून इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं सुरुवात झाली.  पुरुष एकेरीत भारताचा अग्रगण्य खेळाडू लक्ष्य सेनने विजयी सलामी दिली. आपल्या पहिल्याच सामन्यात लक्ष्यने चीनच्या शी यू ची याला २३-२१, १९-२१, २१-१७ असं पराभूत केलं. महिला एकेरीत मालविका बनसोडला चीनच्या चेन यूफेई हिच्याकडून २१-११, २१-६ असा पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत भारताची सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी आज मलेशियाच्या जोडी विरुद्ध खेळेल. तर त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीचा सामनाही आज होणार आहे. दुबईत अडकलेली पी व्ही सिंधू मात्र या स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही, ती भारतात सुखरूप परतली आहे.

****

टीट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघात लढत होणार आहे. कोलकाता इथं संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...